मंडप पाडला म्हणून माजी आमदार राठोड यांची पोलीस ठाण्यात तक्रार; नगर महापालिकेविरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:10 PM2018-09-03T13:10:10+5:302018-09-03T13:11:14+5:30
नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये शिवसेना प्रणित गणेश मंडळाच्या गणपती मंडप उभारणीचे काम सुरू होते. विनापरवानगी रस्त्यात मंडप उभारणी करत असल्यामुळे सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा मंडप जेसीबीच्या साह्याने तोडला.
अहमदनगर : नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये शिवसेना प्रणित गणेश मंडळाच्या गणपती मंडप उभारणीचे काम सुरू होते. विनापरवानगी रस्त्यात मंडप उभारणी करत असल्यामुळे सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा मंडप जेसीबीच्या साह्याने तोडला. त्यामुळे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून, राठोड यांनी उपोषण सुरु केले आहे.
नेता सुभाष चौकात उभारण्यात येणारा मंडप पाडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोलीस फौजफाटा घेऊन सकाळी नेता सुभाष चौकात दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने त्यांनी मंडप पाडला. त्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते सभागृहनेते गणेश कवडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, सुरेश तिवारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी येथील कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले. महापालिकेने कोणतीही नोटीस न देता मंडप पाडल्याची तक्रार त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. मंडप उभारणीसाठी महापालिकेची परवानगी न घेतल्यामुळे हा मंडप पाडल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. तर वास्तविक पाहता प्रशासनाने मंडप उभारण्याची परवानगी अगोदर देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अगोदर परवानगी दिली नाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करताना मंडळ उभारलेला दोन ते तीन आठवडे लागतात. या मंडळाचा मंडप कोणत्याही रस्त्याला अडथळा ठरत नसताना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर मंडप पाडला आहे, असे राठोड यांनी सांगितले.
राठोड यांचे उपोषण
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. अधिका-यांनी कोणतीही पूर्वसुचना न देता मंडप पाडला म्हणून पालिकेच्या निषेधार्थ शिवसेनेचेच माजी आमदार अनिल राठोड यांनी नेता सुभाष चौकात उपोषण सुरु केले आहे.