फरार असलेला मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:31 PM2019-03-29T16:31:43+5:302019-03-29T16:33:26+5:30
रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला मात्र उमेदवारांच्या प्रचारात खुलेआम फिरणारा मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली.
अहमदनगर : रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला मात्र उमेदवारांच्या प्रचारात खुलेआम फिरणारा मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली.
पार्थी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपी मनसेचा जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याचा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडकर पाथर्डीमधून पसार झाला होता. त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी १४ जानेवारीला अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. खेडकर हा २४ मार्च रोजी पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार फेरित सहभागी झाला होता. याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित करून पोलिसांचे लक्ष्य वेधले होते. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेडकर याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.