शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी पक्षातून निलंबित
By अण्णा नवथर | Published: May 2, 2024 08:33 PM2024-05-02T20:33:46+5:302024-05-02T20:34:19+5:30
डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिल्याने कारवाई.
अहमदनगर: शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी अहमदनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचे धोरण घेतल्यामुळे सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
औटी यांनी महाराष्ट्रदिनी समाज माध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाविरोधात पारनेर येथील शिवसेनेचे पदाधिकारी श्रीकांत पठारे, प्रियंका खिलारी, अनिल शेटे, किसन सुपेकर, भास्कर शिरोळे, बाबाजी तनपुरे आदींनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपण औटी यांच्या निर्णयाच्या सोबत नसून शिवसेनिक हे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले.
औटी यांनी हा निर्णय वैयक्तिक स्वार्थापोटी घेतला आहे, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी गाडे यांनी औटी यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र काढले आहे.