साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोकराव खांबेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:31+5:302020-12-26T04:17:31+5:30
नगर जिल्ह्यातील पत्रकारितेत खांबेकर यांचे मोठे योगदान होते. त्यांनी पीटीआयचे पत्रकार म्हणूनही अनेक वर्षे काम केले होते. देशपातळीवरील पत्रकार ...
नगर जिल्ह्यातील पत्रकारितेत खांबेकर यांचे मोठे योगदान होते. त्यांनी पीटीआयचे पत्रकार म्हणूनही अनेक वर्षे काम केले होते. देशपातळीवरील पत्रकार संघटनेवर त्यांनी काम केले आहे. पत्नी मीनल यांना दोनदा कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष व प्रभारी नगराध्यक्षा बनविण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ होते. अत्यंत अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती.
..............
खांबेकर यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांची हानी : मंत्री अशोक चव्हाण
खांबेकर यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांची वैयक्तिक हानी झाली. माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून अशोकराव खांबेकर यांच्याशी चव्हाण कुटुंबियांचे संबंध होते. खांबेकर यांच्या वडिलांची काँग्रेस विचारधारेवर निष्ठा होती. तोच वारसा अशोकराव खांबेकर यांनी संपूर्ण हयातीत जपला होता. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था पीटीआयमध्ये काम करीत असताना ग्रामीण भागातील समस्यांवर, तसेच सर्वसामान्यांच्या ज्वलंत विषयांना त्यांनी वाचा फोडली होती. पत्रकारितेतील त्यांचे योगदान मोलाचे होते. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी असतानाही त्यांनी अनेक चांगल्या व भाविकांच्या हिताच्या योजना राबविल्या. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. अशोकराव खांबेकर यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
२५ अशोकराव खांबेकर, कोपरगाव