अनेक गावांत गड आला, पण सिंह गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:20 AM2021-01-20T04:20:49+5:302021-01-20T04:20:49+5:30
केडगाव : नगर तालुक्यात अनेक गावांत नेत्यांना गावात निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यात यश आले, पण नेत्यांनाच पराभवाचा सामना करावा ...
केडगाव : नगर तालुक्यात अनेक गावांत नेत्यांना गावात निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यात यश आले, पण नेत्यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. तालुक्यातील चार गावांत काठावर बहुमत असल्याने, तेथे सत्ता स्थापन करताना चांगलाच राजकीय खेळ रंगणार आहे. आता सर्वांनाच आपल्या गावात सरपंचपदाचे आरक्षण काय पडते, याची धाकधूक लागली आहे.
नगर तालुक्यातील ५५ गावांत स्थानिक आघाड्यांनी स्पष्ट बहुमत मिळविले आहे. विरोधी आघाडीला केवळ तीन ते चार किंवा एक-दोन जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र, आता सरपंचपदाचे आरक्षण काय पडते यावर स्पष्ट बहुमत असणाऱ्या गावांचे भवितव्य अवलंबून आहे. बहुमत असूनही सरपंचपदाचे आरक्षण असणारा सदस्य आपल्या आघाडीत नसला, तर अशा वेळी विरोधक अल्पमतात असूनही त्यांची लॉटरी लागू शकते. गुंडेगावमध्ये तर गावातील परस्पर विरोधी आघाड्यांना प्रत्येकी सहा-सहा जागा मिळाल्या, तर एक अपक्ष निवडून आला. आता अपक्षाच्या हातात गावाच्या सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. देवगाव येथे सत्ताधारी शिंदे गटाला चार तर विरोधी वामन गटाला तीन जागा मिळाल्या. येथेही सरपंचपदासाठी खेचाखेची होऊ शकते. अशीच स्थिती खडकी व जेऊर गावात उद्भवणार आहे. येथेही काठावर बहुमत असल्याने सरपंचपदासाठी सदस्य फोडाफोडीची शक्यता आहे. यामुळे सर्वांनाच आता सरपंचपदाच्या आरक्षणाची धाकधूक लागली आहे. मोठ्या कष्टाने बहुमत आणले. आता सरपंचपद आपल्याकडेच राहावे, यासाठी प्रार्थना सुरू झाल्या आहेत.
नगर तालुक्यातील निंबळक येथे जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांची गावात सत्ता आली, पण लामखडे यांच्या सून पराभूत झाल्या. खंडाळा येथेही जि.प. सदस्य संदेश कार्ले यांची गावात सत्ता आली, पण त्यांच्या बंधूला पराभव स्वीकारावा लागला. रुईछत्तीशी येथे भाजपची सत्ता आली, पण ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली, ते माजी सरपंच रमेश भामरे हेच निवडणुकीत पराभूत झाले. पिंपळगाव माळवी येथेही भाजपची सत्ता आली, पण नेतृत्व करणारे विश्वनाथ गुंड यांच्या पत्नीचाच येथे पराभव झाला.
.....