नेवाशात गडाखांचा गड आला पण सिंह गेला
By Admin | Published: May 26, 2017 11:48 AM2017-05-26T11:48:41+5:302017-05-26T11:54:03+5:30
माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नऊ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला
आॅनलाईन लोकमत
नेवासा, दि़ २६ - नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नऊ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला असला तरी नगराध्यक्ष पदाची जागा गमवावी लागली आहे़ तर भाजपचे दोन मंत्री व एक आमदाराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले़ मात्र नगराध्यक्षपदावर भाजपाने झेंडा फडकावला आहे़
बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली़ नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला़ मात्र, भाजपाच्या प्रयत्नांवर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाने मात करीत सर्वाधिक ९ जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला़ भाजपाचे सहा उमदेवार निवडून आले़ त्यात दोन उमेदवार अवघ्या २ मतांनी विजयी झाले़ प्रभाग सतरामधील नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार संगीता बर्डे या २०० मतांनी विजयी झाल्या़ क्रांतीकारी पक्षाने ९, भाजपने ६, काँगे्रसने १ व एका अपक्षाने विजय मिळविला़ राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना या पक्षांना खातेही खोलता आले नाही़