चिल्लर घोटाळ्याप्रकरणी चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:11 AM2021-03-13T01:11:16+5:302021-03-13T01:11:31+5:30
नगर अर्बन बँकेतील तीन कोटींचा अपहार; इतर आरोपींवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर अर्बन को-ऑप. बँकेतील अडीच कोटी रुपयांच्या चिल्लर अपहार प्रकरणातील गुन्ह्यात शुक्रवारी अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. या गुन्ह्यातील इतर आरोपींवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे समजते.
अर्बन बँकेचा तत्कालीन मुख्य शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ, मार्केट यार्ड शाखेचा तत्कालीन शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, शाखेतील तत्कालीन कॅशिअर राजेंद्र विलास हुंडेकरी व तत्कालीन पासिंग ऑफिसर स्वप्नील पोपटलाल बोरा अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुख तथा पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.
याप्रकरणी बँकेचे मुख्य शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम बल्लाळ, आशुतोष सतीश लांडगे व इतर संचालकांविरोधात एकूण तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला.
काय आहे प्रकरण:
आरोपी आशुतोष लांडगे हा अर्बन बँकेचा कर्जदार आहे. त्याचे बँकेत मे. टेरासॉफ्ट टेक्नाॅलॉजी नावाने खाते आहे. या खात्यावर बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत ऑक्टोबर २०१७ मध्ये तब्बल अडीच कोटी रुपये चिल्लर स्वरूपात भरणा केल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात बँकेत हा भरणा झालाच नाही. केवळ आभासी भरणा दर्शविण्यात आला. त्यानंतर बँकेतून पुन्हा लांडगे याच्या संस्थेला कर्ज देण्यात आले. बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी हा अपहार चव्हाट्यावर आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
‘लोकमत’ने वेधले लक्ष
अर्बन बँकेतील अपहारप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अडीच महिने उलटले तरीतपासाला गती मिळत नसल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. अखेर पोलिसांनी या गुन्ह्यातील चौघांना अटक केली.