बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला अखेर यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:46 AM2024-09-10T05:46:47+5:302024-09-10T05:47:11+5:30
नगरच्या रुग्णालयातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अनेकांनी बनावट प्रमाणपत्र काढली आहेत.
अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करत चारजणांनी दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्र घेतल्याचे उघड झाल्याने या चौघांसह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
‘लोकमत’ गत महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत येथील तोफखाना पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून सागर भानुदास केकाण, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे व गणेश रघुनाथ पाखरे (सर्व रा. पाथर्डी तालुका, जि. अहमदनगर) यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पूजा खेडकरनंतर नवा घोटाळा
बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने नगरच्या जिल्हा रुग्णालयातूनच दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. ‘लोकमत’ने खेडकरच्या प्रमाणपत्राची माहिती रुग्णालयाकडे मागितली. मात्र, रुग्णालय ही माहिती देण्यास तयार नाही. नगरच्या रुग्णालयातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अनेकांनी बनावट प्रमाणपत्र काढली आहेत. रुग्णालयाने आजवर दिलेल्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करा, अशी मागणी अनेक संघटनांनी येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे केली आहे. मात्र, घोगरे यांनी याबाबत काहीही निर्णय अद्याप घेतलेला नाही. अशा तपासणीतून मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.