चार चिमुकल्यांचा विजेच्या धक्क्याने ओढवला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:26 AM2022-10-09T06:26:13+5:302022-10-09T06:26:29+5:30
खंदरमाळ परिसरात वादळाने तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील (येठेवाडी) खंदरमाळ परिसरात वादळाने तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरला. या नाल्यात आंघाेळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
दर्शन अजित बर्डे (८), विराज अजित बर्डे (६), अनिकेत अरुण बर्डे (१२), ओंकार अरुण बर्डे (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही मुले आदिवासी कुटुंबातील असून, घरची परिस्थिती बिकट आहे. दर्शन, विराज, अनिकेत, ओंकार हे येठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. मुले शाळेत गेल्यानंतर आई-वडील मजुरीच्या कामावर निघून गेले होते. नंतर मुले वांदरकडा येथील छोट्याशा नाल्यात आंघोळीसाठी गेली असता याच नाल्याच्यावरुन गेलेली वीजवाहक तार तुटून पाण्यात पडलेली होती. हे मुलांच्या लक्षात आली नाही. पाण्यात उतरल्यानंतर वीजेचा शॉक लागून या चारही मुलांचा मृत्यू झाला.
झोळीतून नेले मृतदेह
nपावसामुळे रस्ता खराब झाल्याने रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे चारही मृतदेह झोळीच्या माध्यमातून तरुणांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
nनाल्यात वीजवाहक तार तुटून पडल्याबाबत महावितरणला कळविले होते. मात्र, महावितरणने तात्काळ दखल न घेतल्याने या चिमुकल्यांचा बळी गेला, अशी चर्चा होती. दरम्यान, येथील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, कोणीतरी हा वीजपुरवठा सुरु केला, असा खुलासा महावितरणने केला आहे.