पावसामुळे नेवाशात घर कोसळून चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 11:13 PM2019-10-23T23:13:35+5:302019-10-24T06:02:15+5:30
बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पठाण वाड्यातील एका खोलीचे छत कोसळले.
अहमदनगर: मुसळधार पावसामुळे नेवासा येथे घराचे छत कोसळून भिंतीखाली दबल्याने चार जण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. जाफरखान पठाण (वय ६२),उसामा खान पठाण (वय १८), नर्गिस शहजादेखान पठाण (वय ३०), बेबी रहतुल्ला खान पठाण (वय ६०) अशी मयतांची नावे आहेत.
बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पठाण वाड्यातील एका खोलीचे छत कोसळले. या छताखाली दबल्याने चौघांचा मृत्यू झाला. संपूर्ण खोलीच खाली बसल्याने चौघांना बाहेर पडणे कठीण झाले. मातीखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडताच नागरिकांनी पठाण वाड्याकडे धाव घेतली. मलब्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. दबलेल्या पाच जणांना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र त्यातील चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यातील जखमी अरमान पठाण याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे नेवासा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.