पुणे-नाशिक मार्गावरील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:17 PM2020-08-28T15:17:38+5:302020-08-28T15:19:58+5:30
दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात
पारनेर(अहमदनगर) : मुंबईवरून अहमदनगरमधील पारनेरकडे परतणारा छोटा टेम्पो व दुसऱ्या एका टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद शिवारात शुक्रवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास अपघात झाला. मृत चौघेही पारनेर तालुक्यातील करंदी येथील आहेत. ते मुंबईला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असत. सुरेश नारायण करंदीकर (वय ४४), सिद्धार्थ राजेश उघडे (वय २२), आकाश सुरेश रोकडे (वय २६), सुनील विलास उघडे (वय १९, सर्व रा. करंदी, ता.पारनेर) अशी मृतांची नावे आहेत.
करंदी येथील सुरेश करंदीकर, सिद्धार्थ उघडे, आकाश रोकडे, सुनील उघडे हे तरूण परिसरातील भाजीपाला खरेदी करून तो मुंबई येथे विक्रीस नेत होते. गुरूवारी सायंकाळी हे तरूण छोटा टेम्पो (क्र. एम. एच. १६ सी. सी. ६८३८८) मधून भाजीपाला घेऊन मुंबईला गेले होते. तेथे भाजीपाला विक्री करून छोट्या टेम्पोतून पारनेरकडे परतत होते. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास वडगाव आनंद (ता. जुन्नर, जि. पुणे) शिवारात समोरून येणाºया टेम्पोने (क्र. एम. एच १६ ए. ई. ९०८०) तरूण प्रवास करीत असलेल्या छोट्या टेम्पोला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात छोट्या टेम्पोचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात वाहनातील चौघाही तरूणांचा जागीच मृत्यू झाला.
लॉकडाऊननंतर या चारही तरूणांनी मुुंबई शहरामध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वत:च्या घरचा भाजीपाला तसेच परिसरातील भाजीपाला खरेदी करून ते मुंबईत विक्री करीत होते. त्यांच्या या व्यवसायाचा चांगला जम बसू लागला असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील सुरेश करंदीकर हे विवाहित असून अन्य तिघे अविवाहित होते.
अपघाताची माहिती समजल्यानंतर राजेंद्र करंदीकर यांच्यासह शशीकांंत करंदीकर, सुरेश रोकडे, रवींद्र रोकडे, विलास उघडे, निलेश खोमणे, प्रकाश उघडे, सागर करंदीकर, सनी उघडे, जितेंद्र उघडे, रोहित उघडे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदतकार्य केले.