जामखेडमधील चौघांना डिस्चार्ज; नगरमधील आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:45 PM2020-05-11T15:45:28+5:302020-05-11T15:46:12+5:30
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जामखेड येथील ४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
अहमदनगर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जामखेड येथील ४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
सोमवारी रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १० जणांवर उपचार सुरू असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
जामखेड येथील या रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, नर्सेस यांनी रुग्णांना निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या रुग्णांनीही त्यांच्यावर चांगले उपचार आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफचे आभार मानले. नेवासा येथील रुग्णाचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.
आतापर्यंत एकूण १७५० व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६५८ स्त्राव निगेटिव्ह आले, तर ५३ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. आता ४० व्यक्ती बºया होऊन घरी परतल्या आहेत. सध्या ९ रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये, तर १ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. यात पाथर्डी येथील १, जामखेड येथील १, संगमनेर येथील १ आणि धांदरफळ येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांचे अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. यात जामखेड येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्याला आणखी ७ दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून यात संगमनेर ३, धांदरफळ २, नगर १, श्रीरामपूर १, तर जामखेड येथील ४ आदींचा समावेश आहे. अद्याप ७ अहवालांची प्रतीक्षा आहे.