बालविवाह प्रकरणी अखेर चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:52+5:302021-08-23T04:23:52+5:30
शेवगाव : अखेर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात शून्य नंबरने त्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल ...
शेवगाव : अखेर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात शून्य नंबरने त्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची आई, मामा, आजी यांच्यासह नवरदेवावर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा चकलंबा (जि. बीड) पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणी नगर येथील चाईल्ड लाईन संस्था व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. फिर्यादीत म्हटले आहे की, पतीला सोडून पत्नी तीन मुलींसह एक मुलगा यांना घेऊन सध्या शिक्रापूर (जि. पुणे) येथे मुलाबाळांसमवेत राहते. तिचा पती हिंगेवाडी (जि. शेवगाव) येथे त्याच्या वडिलांसमवेत राहतो. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केशव ऊर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याच्यासोबत पत्नी मुलीचे लग्न लावून देणार असल्याचे पतीला व्हॉट्सॲपवरील लग्नपत्रिकेवरून समजले. लग्नपत्रिकेत १८ ऑगस्टला कुढेकरवस्ती बोधेगाव येथे विवाहस्थळ असल्याचे त्यात नमूद होते. त्यानंतर पतीने चाईल्ड लाईनला संपर्क करून अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेवगाव पोलिसांनी कळविल्यानंतर १६ ऑगस्टला बोधेगाव बीटचे पोलीस अंमलदार, ग्रामसेवक यांनी, लग्नपत्रिकेतील पत्त्यावर जाऊन खात्री केली आहे. मात्र, त्यांच्या घराला कुलूप होते. बालविवाह होत असल्याबाबत पोलिसांना समजल्याची कुणकुण लागताच संबंधित लोक तिथून कुठेतरी निघून गेले. त्यानंतर मुलीचा बालविवाह केशव ऊर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याच्यासोबत नियोजित ठिकाणी न करता गायकवाडी जळगाव (चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड) येथील अंध-अपंगांची शाळा येथे झाला आहे. मुलीचा जाणीवपूर्वक बालविवाह लावून देण्यास पत्नी रंजना, मेहुणा बबलू विष्णू मोरे, सासू विजूबाई मोरे, केशव ऊर्फ सोमनाथ पांडुरंग भवर हेच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्यात शून्य नंबरने गुन्हा दाखल केला.
----
कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही गंभीर बाब आहे. ग्रामीण स्तरावरील यंत्रणांपासून तर जिल्हास्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी अशा बालविवाह लावणाऱ्या व्यक्तींवर त्वरित कठोर कारवाई केली तर हे बालविवाह थांबू शकतात. यासाठी सजग नागरिकांनी बालविवाह होत असल्याबाबतची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला वेळेवर सांगावी.
-हनिफ शेख,
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, अहमदनगर