आगीत चार घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:30+5:302021-04-04T04:20:30+5:30
कोंभाळणे शिवारातील या वस्तीत रखमाबाई लक्ष्मण पथवे, सदू भागा गावंडे, नामदेव लक्ष्मण मेंगाळ आणि भीमराव आनंदा गावंडे ही चार ...
कोंभाळणे शिवारातील या वस्तीत रखमाबाई लक्ष्मण पथवे, सदू भागा गावंडे, नामदेव लक्ष्मण मेंगाळ आणि भीमराव आनंदा गावंडे ही चार कुटुंबे राहत होती. नारायण गाव, संगमनेर व इतर ठिकाणी मोलमजुरी करून या कुटुंबांनी आपल्या रोजी रोटीसाठी लागणारे धान्य घरात साठवून ठेवले होते. या चारही कुटुंबातील माणसे संगमनेर येथे आपल्या एका नातेवाइकाच्या घरी गेले होते. फक्त एक वयोवृद्ध महिला घरी थांबली होती.
याच शिवारात आपल्या एका खासगी शेतात पालापाचोळा पेटवला होता. यावेळी जोरदार वारा सुटला आणि आगीने आपले उग्र रूप धारण केले. ही आग आटोक्यात न आल्याने दूरवर असणाऱ्या या चारही घरापर्यंत ही आग पोहोचली. आग आटोक्यात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र ते निरर्थक ठरले आणि या चारही कुटुंबांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घरात असणारे सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, शेळ्या, कागदपत्रे, रोख रक्कम जळून खाक झाली. सुमारे २० हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून गेल्याचे पंचनामा करणारे अधिकारी कुलकर्णी आणि खेमनर यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी पंचनामा करून आपद ग्रामस्थांना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले.
कुटुंबे उभी करण्यासाठी मदत करणार
शनिवारी सकाळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोंभाळणे येथे घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना महसूल विभागास सूचना दिल्या. या चारही कुटुंबास सर्वोतपरी मदत देण्यात येणार असल्याचे आमदार किरण लहामटे यांनी यावेळी आश्वासन दिले.
...................
ग्रामस्थ धावले मदतीला
आपल्या गावाच्या वस्तीतील चार कुटुंबांची घरे आगीत जळून खाक झाली. सर्वच अन्न धान्य जळून गेले आणि त्यांचा संसार उघड्यावर पडला हे पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता ग्रामस्थांनी पुढे सरसावत या चारही कुटुंबांना गावातून तातडीने धान्य व अत्यावश्यक मदत उपलब्ध करून दिली.
..........