लक्झरी बस-सेंट्रो कार अपघातात चार ठार; करंजीजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:38 AM2020-12-28T11:38:10+5:302020-12-28T11:40:34+5:30
लक्झरी बस आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. हा अपघात कल्याण-निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुभद्रा हॉटेलसमोर मध्यरात्री २ वाजता घडला.
करंजी : लक्झरी बस आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. हा अपघात कल्याण-निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुभद्रा हॉटेलसमोर मध्यरात्री २ वाजता घडला.
पुण्याहुन नांदेडकडे जात असलेली परभणी जिल्हयातील सेलू येथील केशवछाया या ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ( क्रमांक एम.एच. ३८- एक्स - ८५५५ ) व परभणी येथून पुण्याकडे जात होती. तर सेंट्रो कार ( क्रमांक एम.एच. १२ सी. डी. २९१२ ) पाथडीर्कडे चालली होती. या दोन्ही वाहनांची करंजीजवळ असलेल्या सुभद्रा हॉटेलसमोर जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात सेंट्रो कारमधील केशव विलास बोराडे ( वय २५, रा. कोथरूड, पुणे), परमेश्वर लक्ष्मणराव डाके ( वय ४०, रा. सदर), बाळासाहेब शंकरराव कदम (रा. धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर सेंट्रो कारचा चालक विनोद धावणे हा दवाखान्यात नेत असताना मरण पावला. अपघातानंतर लक्झरी बसचा चालक मात्र फरार झाला.
मध्यरात्री २ वाजता झालेल्या या अपघात वाहनांची धडक होताच मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या वस्तीवरील लोक भर झोपेत असताना जागे होवून रस्त्यावर आले. तोपर्यंत लक्झरीचा चालक फरार झाला होता.
अपघाताची खबर मिळताच देवराई येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पालवे, गणेश अकोलकर, प्रमोद क्षेत्रे, आशिष क्षेत्रे यांनी तत्काळ महत केली. जखमींच्या मदतीसाठी महामार्ग पोलिस व पाथर्डी पोलिस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जखमींना मदत केली.