लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठार
By Admin | Published: May 16, 2016 12:00 AM2016-05-16T00:00:07+5:302016-05-16T00:10:22+5:30
राहाता : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार तर चार जखमी
राहाता : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली़
रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस (क्ऱ एम़ पी़ १५, पी़ ३९५४) व कंटेनर (क्ऱ जी़ आय़ १२, झेड. १३३६) हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़ कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (वय ४३, उज्जैन, मध्यप्रदेश), वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही), रचना जैन (वय ४२, उज्जैन), अर्चना शहा (वय ४५, इंदोर) हे मयत झाले़ मयतांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले़ या अपघातात दिमला गुलशन दुप्पड (वय ६०, नगर), विरेश चड्डा (नगर), रितेश दिनेशकुमार जैन (वय ४५, इंदोर) जनक रितेश जैन (वय १३, इंदोर) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ (वार्ताहर)
आठवड्यातील दुसरी घटना
दरम्यान, पहाटेच्या वेळी महामार्ग पोलिसांकडून अस्तगाव माथा येथे वाहने अडवली जातात. रविवारी पहाटेही पोलिसांनी कंटनेरला पोलीस व्हॅन आडवी लावल्यामुळे कंटनेर चालकाने जोरात ब्रेक मारला़ त्यामुळे पाठीमागून येणारी लक्झरी बस कंटेनरमधील पवनचक्कीच्या पात्यावर आदळली, असे बसमधील प्रवाशांनी सांगितले़ कोल्हार येथेही मागील आठवड्यात याच प्रकारे कंटेनरमधील पवनचक्कीला धडक झाल्याची घटना ताजी आहे़