चार जणांना लसीकरणानंतर डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:30+5:302021-01-18T04:19:30+5:30
अहमदनगर : शनिवारी लसीकरण झाल्यानंतर चार आरोग्य कर्मचाऱ्यांना ताप, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास झाला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. कोणतीही ...
अहमदनगर : शनिवारी लसीकरण झाल्यानंतर चार आरोग्य कर्मचाऱ्यांना ताप, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास झाला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. कोणतीही लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी होणे ही सामान्य लक्षणे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
शनिवारी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या दिवशी १,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८७१ म्हणजे ७२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यातील केवळ चार जणांना अंगदुखी, डोकेदुखी, ताप, मळमळ, उलटी असा त्रास झाला; मात्र ही लक्षणे सामान्य स्वरूपाची असून कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. कोणतीही लस किंवा इंजेक्शन घेतले तरी बऱ्याच वेळा अशी लक्षणे दिसतात व त्रास होतो. तरीही चारही आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना बरे वाटल्यास घरी पाठवण्यात येईल, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, १६ जानेवारीला जिल्ह्यासाठी ३२ हजार ९०० डोसेस प्राप्त झाले. त्यातील महापालिका क्षेत्रासाठी ७ हजार ५००, एमआयआरसीसाठी ३१०, ग्रामीण भागासाठी २५ हजार ४०० डोसेस देण्यात आले आहेत. महपालिका क्षेत्रात ४, ग्रामीण भागातील ८ केंद्रावर लसीकरण सुरू झाले. प्रत्येक केंद्रावर प्रतिदिनी १०० कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये पहिल्या दिवशी १,२०० कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले होते. त्यापैकी ८७१ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यामध्ये महपालिकेच्या केंद्रावर २६१ आणि ग्रामीण भागातील केंद्रावर ६१० जणांनी लस घेतली. लसीकरणानंतर चार जणांना आढळलेली लक्षणांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र ललीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. पहिल्या टप्प्यात १५ हजार ५०० आणि दुसऱ्या टप्प्यात १६ हजार २५६ कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-------------------
दोन दिवस लसीकरण बंद
लसीकरण प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची माहिती असलेले को-विन ऑपमध्ये राज्यस्तरावर तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे रविवार आणि सोमवार अशा दोन दिवस लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. मंगळवारी लसीकरण पुन्हा सुरू होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.