‘केदारेश्वर’कडून गारपीटग्रस्तांना प्रत्येकी चार हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:53+5:302021-03-22T04:19:53+5:30
बोधेगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील गारपीटग्रस्त सभासद शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत तातडीने दिली जाणार आहे. ...
बोधेगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील गारपीटग्रस्त सभासद शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत तातडीने दिली जाणार आहे. तशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी केली. अस्मानी संकटात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अशाप्रकारे मदत करणारा केदारेश्वर हा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव परिसरातील लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, शेकटे बुद्रुक, राणेगाव, नागलवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यासह गारपिटीने अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांची ॲड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी दुपारी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी येथील विमल वैद्य, बबन तहकीक, संजय आंधळे, पंढरीनाथ ढाकणे, कालिदास आंधळे आदी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहाय्यक सुभाष बारगजे, गजानन चव्हाण, तलाठी बाबासाहेब अंधारे आदी उपस्थित होते. पाहणी दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी झालेल्या नुकसानीची ढाकणे यांच्यासमोर कैफीयत मांडली. गारपिटीने गहू, कांदा, हरभरा, बाजरी आदींसह फळबागांचे झालेले नुकसान पाहून ढाकणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिली. काळजी करू नका, शासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे म्हणत दिलासा दिला. तसेच केदारेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त प्रत्येक सभासद शेतकऱ्याला कारखान्याकडून चार हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली. अस्मानी संकटामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एखाद्या सहकारी साखर कारखान्याकडून थेट मदत जाहीर होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. याद्वारे केदारेश्वरने इतरांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
यावेळी केदारेश्वरचे उपाध्यक्ष प्रकाश घनवट, काकासाहेब तहकीक, भाऊसाहेब क्षीरसागर, उपसरपंच दत्ता तहकीक, गहिनीनाथ ढाकणे, तात्यासाहेब मारकंडे, संजय आंधळे, रंगनाथ परदेशी, राजेंद्र मारकंडे, नामदेव सानप, विक्रम ढाकणे, भुजंग फुंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
--
बुरशीनाशक फवारणी गरजेची..
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या कांदा पिकासाठी बुरशीनाशकांची फवारणी केली, तर पिकास थोडी मदत होईल. इतर इन्फेक्शन होणार नाही व कांद्याचे पुढील नुकसान टळू शकेल. यासाठी बुरशीनाशक फवारणी गरजेची असल्याचे नुकसान पाहणी दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
--
भुईसपाट झालेला ऊस तत्काळ तोडणार..
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गारपिटीने भुईसपाट झालेल्या ऊसाला केदारेश्वर कारखाना तत्काळ तोड देणार असल्याचेही ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
---
२१ बोधेगाव
लाडजळगाव (ता.शेवगाव) परिसरात गारपीट-वादळाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना ‘केदारेश्वर’चे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे. समवेत उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे व इतर.