नगर जिल्ह्यातील चौदा गावांना ‘स्मार्ट ग्राम’ पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 04:38 PM2020-01-24T16:38:43+5:302020-01-24T16:39:40+5:30
स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेली आहे.
अहमदनगर : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेली आहे. या तालुकास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेल्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन प्रजासत्ताकदिनी गौरव केला जाणार आहे.
स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी झालेल्या गावांच्या तालुकास्तरीय तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत. यातून तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून १४ गावांची निवड झालेली आहे. गणोरे (अकोले), पेमगिरी (संगमनेर), पोहेगाव (कोपरगाव), दाढ बुद्रूक (राहाता), महांकाळ वडगाव (श्रीरामपूर), वांबोरी (राहुरी), मक्तापूर (नेवासा), आव्हाणे बुद्रूक (शेवगाव), कासार पिंपळगाव (पाथर्डी), शिऊर (जामखेड), खेड (कर्जत), उक्कडगाव (श्रीगोंदा), डिकसळ (पारनेर), आठवड (नगर) या गावांची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झाली आहे. या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांना २६ जानेवारी रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व गावांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.