नगर जिल्हा विभाजनावरुन विखे, ढाकणे यांच्यात संघर्षाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:37 PM2018-03-31T16:37:31+5:302018-03-31T16:38:56+5:30
दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला.
पाथर्डी : युवा नेते डॉ.सुजय विखे व प्रताप ढाकणे यांच्यात जिल्हा विभाजनावरून संघर्षाची ठिणगी पडली असून दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला. व दक्षिणेतील सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा विभाजनावर एकत्र येण्याचे आवाहनही ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
विखेंवर टीका करतांना ढाकणे म्हणाले, आजपर्यत दक्षिणेचा विकास निघी उत्तरेकडील लोकांनी पळविला. तुमच्याकडे सत्ता, संपत्ती आहे. आम्ही अर्र्धपोटी असलो तरी अन्याय सहन करणार नाही. आम्ही न्याय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्ही मोठे होतांना आम्हाला लहान करू नका. जिल्हा विभाजन झालेच पाहीजे. झाले तर आताच होईल. कारण पालकमंत्री दक्षिणेचे आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात तुम्हाला दक्षिणेचे प्रेम उफाळून आले. जिल्हा परीषदेचा निधी ठराव गटांनाच दिला जातो याचा आम्ही जाब विचारणार आहोत.
नैसर्गिकदृष्ट्या आम्ही दुष्काळी असलो तरी बौघ्दीक दूष्टया सक्षम आहोत. राजकारणाच्या स्वार्थासाठी तुम्ही काय चालवलय. नगर जिल्हयात आदराला आदर तर ठोशाला ठोसा ही भावना सर्वाच्या मनात आहे. याबाबत मी स्पष्टपणे बोललो आहे. दक्षिणेत यायचे, भांडणे लावून स्वार्थ साधायचा. चांगल्या कार्यकर्त्याना नादी लावायचे हे तुमचे उदयोग. पाथर्डी पालीका निवडणूकीत कारण नसतांना वाद लावून निघून गेले. ही कुठली मस्ती. सत्ता व संपत्तीचे प्रदर्शन दक्षिण भाग सहन करणार नाही. जिल्हा विभाजनामुळे दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळणार असून आमचा निधी आमच्या भागात खर्च होणार आहे. त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहीजे, याचा पुनरुच्चार ढाकणे यांनी केला.
यावेळी नगरसेवक बंडू पा.बोरूडे, सीताराम बोरूडे, अमोल बडे, योगेश रासने उपस्थित होते.