एटीएम क्लोन करून फसवणूक; मिर्झापूरचा मास्टरमाइंड गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:26 AM2021-09-16T04:26:46+5:302021-09-16T04:26:46+5:30
तीन महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका पेट्रोलपंपावर दोघांनी काही ग्राहकांची एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यांतून पैसे ...
तीन महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका पेट्रोलपंपावर दोघांनी काही ग्राहकांची एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यांतून पैसे काढले होते. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी धीरज अनिल मिश्रा व सूरज अनिल मिश्रा या दोघा बंधूंना अटक केली होती. सुजित सिंग याच्या सांगण्यावरून एटीएम क्लोन करीत असल्याचे या दोघांनी सांगितले होते. तेव्हापासून सायबर पोलीस सिंग याच्या मागावर होते. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना माहिती मिळाली की, सिंग हा वसई-विरार येथे आहे. त्यानंतर पथकाने त्याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून एक लॅपटॉप, पाच मोबाईल, एक कॉम्प्युटर, सात पेन ड्राईव्ह, चार स्किमर मशीन, एक कलर प्रिंटर, ५४ बनावट एटीएम कार्डे, ४६ कोरे बनावट कार्डे, वेगवेगळ्या कंपन्यांची सहा सिम कार्डे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेड काॅस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------------------
आरोपी अवघा आठवी शिकलेला
टोळीचा प्रमुख सिंग हा अवघा आठवी शिकलेला आहे. काही वर्षांपूर्वी तो ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या नायजेरियन गुन्हेगारांच्या संपर्कात आला. त्यांच्याकडून त्याने एटीएम क्लोन करून पैसे चोरायचे तंत्र शिकून घेतले. त्यानंतर स्वत:ची टोळी तयार करून अनेकांना गंडा घातला. सिंग याच्याविरोधात अहमदाबाद, सुरत, मुंबई, आदी ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
-------------------------------
अशी आहे गुन्ह्याची पद्धत
पेट्रोलपंपावर अथवा इतर दुकानांत या टोळीतील आरोपी नोकरी करतात. कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांचे कार्ड या आरोपींच्या हातात आल्यानंतर ते तत्काळ त्यांच्याकडे असलेल्या छोट्या स्किमर मशीनमध्ये ते कार्ड क्लोन करतात. तसेच पेमेंटसाठी ग्राहकांकडून एटीएमचा पिन विचारून घेतात. आरोपींच्या हातात डाटा येताच त्याद्वारे बनावट सिम कार्ड तयार करून एटीएम मशीनमधून पैसे काढून घेतात.
-------------------------
फोटो १५ आरोपी
एटीएम कार्ड क्लोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली.