सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक; ए आर हॉलिडेज कंपनीवर गुन्हा

By अण्णा नवथर | Published: September 2, 2023 08:50 AM2023-09-02T08:50:57+5:302023-09-02T08:52:23+5:30

नगरमधील गुंतवणुकदारांची तक्रार

fraud by pretending to provide a hotel for a trip crime registered against ar holidays company | सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक; ए आर हॉलिडेज कंपनीवर गुन्हा

सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक; ए आर हॉलिडेज कंपनीवर गुन्हा

अण्णा नवथर, अहमदनगर:  सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल्स पुरविण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर हॉटेल्स उपलब्ध करुन न देता नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ए.आर. हॉलिडेज कंपनीचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक करणाऱ्या कंपनीचे वसई येथे मुख्यालय आहे. या कंपनीने  २०२२ मध्ये नगर शहरात विविध हॉटेलमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमध्ये नागरिक उपस्थित राहिले, तर त्यांना एका सहलीसाठी मोफत हॉटेल्स दिले जाईल, असे फोनवर सांगितले गेले. त्यामुळे अनेक नागरिक सेमिनारमध्ये गेले. सेमिनारमध्ये ‘आमच्या कंपनीत पुढील पाच वर्षांसाठी दीड लाख रुपये गुंतविल्यास तुम्हाला दरवर्षी सहा रात्र व सात दिवसांसाठी भारतात व आशियाई राष्ट्रांत फोर व फाईव्ह स्टार हॉटेल्सची सुविधा दिली जाईल’, असे सांगितले गेले. त्याचवेळी अनेक नागरिकांकडून ही रक्कम ऑनलाईन अथवा रोख स्वरुपात घेतली गेली. काही नागरिकांकडून पॅकेजनुसार वेगळे पैसे घेतले गेले. 

पैसे भरल्यानंतर गुंतवणूकदारांना तसे पत्र पाठविले गेले. तसेच सेमिनारला उपस्थित राहिल्याबद्दल एका सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे फ्री हॉऊचर दिले गेले. त्यानंतर मागणी केल्यानंतरही गुंतवणूकदारांना हॉटेल्स मात्र उपलब्ध करुन देण्यात आले नाही. गुंतवणुकदारांनी फोन तसेच मेलवर कंपनीशी वारंवार संपर्क केल्यानंतरही कंपनीने दखल घेतली नाही. याऊलट गुंतवणूकदारांकडे वर्षाअखेर १ हजार ९९९ रुपयांचा युटिलिटी चार्ज मागितला गेला. हे चार्जेस भरले तरच हॉटेलचे बुकिंग मिळेल, असे सांगितले गेले. कंपनीच्या वतीने सरफराज, स्वप्नील साळे यांसह विविध लोकांनी सेमिनारमध्ये सादरीकरण केले. मात्र, त्यांनीही गुंतवणूकदारांना नंतर काहीही मदत केली नाही.

गुंतवणुकदारांना कंपनीचे मालक अमित राणा, वृंदा, सुवर्णा भोगल या कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितला. मात्र, त्यांनीही काहीही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या कंपनीचे कार्यकारी संचालक अमित राणा, सरफराज, स्वप्नील साळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुजाता लंके, अंजली देशमुख, राजेंद्र घोडके या नगरमधील नागरिकांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात राज्यभर अनेक गुंतवणूकदार असण्याची शक्यता आहे.

Web Title: fraud by pretending to provide a hotel for a trip crime registered against ar holidays company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.