शेतकऱ्यांची फसवणूक; दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:45+5:302021-02-12T04:19:45+5:30
या प्रकरणी विजय आसने, केशव आसने, कृष्णा मुठे, बाबूराव मुठे, पोपट काळे, गणेश जोशी, किशोर पटारे, सोन्याबापू विधाटे, शिवाजी ...
या प्रकरणी विजय आसने, केशव आसने, कृष्णा मुठे, बाबूराव मुठे, पोपट काळे, गणेश जोशी, किशोर पटारे, सोन्याबापू विधाटे, शिवाजी राऊत यांनी फिर्याद दिली आहे. हे शेतकरी माळवाडगाव, उंदीरगाव व भोकर येथील आहेत. त्यांच्याकडून ११ लाख ८ हजार रुपयांचे सोयाबीन, मका, हरभरा, बाजरी व गहू खरेदी केले होते. या शेतकऱ्यांना मुथ्था यांनी धान्य खरेदीच्या पावत्या तसेच धनादेश दिले होते. तालुक्यातील विविध गावांतील १६ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी आमदार लहू कानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका पोलीस ठाण्यात ४७ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या. पोलीस निरीक्षक मसूद खान हे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, दोघा व्यापारी बंधूंनी एका राष्ट्रीयीकृत बँकेसह पतसंस्थेचे मोठे कर्ज घेतल्याची माहिती आहे. याशिवाय तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी बुडविले आहेत. मात्र धनादेश अथवा पक्की बिले नसल्याने शेतकरी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे पुढील काळात या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
.............
शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा दुसऱ्यांदा प्रकार
यापूर्वी नवल बोरा या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे बुडवून धूम ठोकली होती. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो फरार आहे. पोलीस बोरा याच्या शोधात असतानाच मुथ्था यानेही अशाच प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करून धूम ठोकल्याने खासगी व्यापाऱ्यांविरोधात रोष वाढत आहे.
-----------
मुथ्था कुटुंबासह फरार
व्यावसायिक मुथ्था हे माळवाडगाव येथे सहकुटुंब राहत होते. मात्र, ते कुटुंबासह गेल्या शनिवारी मध्यरात्री माळवाडगाव येथील राहत्या घरातून फरार झाले. मुथ्था फरार झाल्याचे समजताच शेतकऱ्यांचा रोष प्रचंड वाढला. शेतकऱ्यांनी तत्काळ पोलीस, लोकप्रतिनिधींची भेट घेऊन कैफियत मांडली.