कांदा बियाण्यात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:58+5:302021-03-22T04:19:58+5:30
चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात उन्हाळी कांद्याचे बी म्हणून लाल कांद्याचे बी शेतकऱ्यांच्या माथी मारत दुकानदाराने शेतकऱ्यांची फसवणूक ...
चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात उन्हाळी कांद्याचे बी म्हणून लाल कांद्याचे बी शेतकऱ्यांच्या माथी मारत दुकानदाराने शेतकऱ्यांची फसवणूक केली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या बियाण्याच्या कंपनीविरोधात शेतकरी न्यायालयात दाद मागणार आहेत, असे शेतकरी पंकज गाढवे यांनी सांगितले.
सोनेवाडी परिसरात गट नंबर ३३०मध्ये शेतकरी पंकज शंकरराव गाढवे यांनी सहा एकर क्षेत्रामध्ये डिसेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. चालूवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे कांदा बियाण्यांची मागणी वाढली होती. त्याचाच फायदा काही दुकानदारांनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. कोपरगाव शहरातून जालना येथील सपन कंपनीचे कांद्याचे उन्हाळी बी एका कृषी सेवा केंद्रातून त्यांनी विकत घेतले होते. दुकानदाराने शेतकऱ्यांना जवळपास २८ किलो बी विकले होते. गाढवे यांनी कोपरगाव कृषी विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर कृषिसेवक संदीप राठोड यांनी गाढवे यांच्या पिकाची पाहणी केली. गाढवे यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारही केली आहे. ही तक्रार केल्यानंतर जालना येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही आम्ही आपल्या शेतात येऊन पाहणी करू, असे सांगितले. मात्र, अजूनपर्यंत पाहणी केली नाही.