सारोळा कासारच्या मतदार यादीत अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:49+5:302021-02-11T04:22:49+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार सेवा संस्थेच्या मतदार यादीवरून तालुक्याचे राजकारण चांगलेच पेट घेत आहे. निवडणुकीसाठी ८५५ कर्जदार ...
केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार सेवा संस्थेच्या मतदार यादीवरून तालुक्याचे राजकारण चांगलेच पेट घेत आहे. निवडणुकीसाठी ८५५ कर्जदार सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती घेण्याची मुदत सुरू आहे. त्या यादीत अनेक कर्जदार क्रियाशील सभासदांची नावे आलेली नाहीत. त्यांना न्याय देण्याऐवजी नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून ५२ अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसविण्याचा प्रयत्न सुरू असून यादीत अफरातफर होत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी केला आहे.
नगर तालुक्यातील अनेक सेवा सोसायट्यांच्या निवडणूक कार्यक्रम सद्या सुरू झाला आहे. ठिकठिकाणी प्रारूप यादी प्रसिद्ध करणे, हरकत घेणे, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे असे कार्यक्रम सुरू आहेत. सारोळा कासार मध्येही २२ जानेवारी रोजी ८५५ कर्जदार क्रियाशील सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक क्रियाशील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली नसून त्या सभासदांना न्याय देण्याऐवजी नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून ५२ अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप कडूस यांनी केला आहे. हे ५२ सभासदांच्या नावे जमीन नाही. त्यांना कोणतेही कर्ज देण्यात आलेले नाही, असे असताना नाममात्र फी घेत त्यांना सभासद करून घेतले आहे. सेवा सोसायटी सचिवांवर दबाव आणून त्यांच्याकडून अनेक खोटे दाखले तयार करून घेण्यात आले असून खरे कर्जदार क्रियाशील सभासद मतदानापासून वंचित ठेऊन अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसविण्याचा प्रयत्न उपनिबंधक कार्यालयाकडून केला जातो, असा आरोप करण्यात आला आहे.
---
यादी कशी प्रसिद्ध करावी हा अधिकार सोसायटी सचिवांचा आहे. आमच्याकडे पत्र आणि अपात्र हाच विषय येतो. ज्या सभासदाला दोन वर्ष पूर्ण झाली असतील तर तो मतदानास पत्र ठरतो. २७ ऑक्टोबर २०२० च्या अध्यादेश नुसार क्रियाशील आणि अक्रियाशील याबाबत सूट देण्यात आली आहे. तो सभासद कसा झाला हा आमचा विषय नाही. क्रियाशील असो की अक्रियाशील त्यास दोन वर्ष पूर्ण झाले असतील तर तो मतदानास पात्र राहील.
किसन रत्नाळे,
तालुका उपनिबंधक, नगर तालुका