संगमनेर येथे दागिने उजळून देण्याच्या बाहण्याने महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 08:58 PM2018-03-05T20:58:03+5:302018-03-05T20:58:48+5:30
पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देण्याचा बहाणा करीत महिलेची फसवणूक करणा-या दोघांनी नऊ तोळ्यांचे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
संगमनेर : पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देण्याचा बहाणा करीत महिलेची फसवणूक करणा-या दोघांनी नऊ तोळ्यांचे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास चंद्रशेखर चौक परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभना चंद्रशेखर मुळे (रा. चंद्रशेखर चौक, संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शोभना मुळे या चंद्रशेखर चौकातील घरात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एकट्याच होत्या. यावेळी तेथे आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देतो, असे सांगितले. त्या दोघांवर मुळे यांनी विश्वास ठेवत घरातील नऊ तोळे सोन्याचे दागिने आणून दिले. या दागिन्यांवर काहीतरी प्रक्रिया करीत दागिने उजळून देणा-यांपैकी एकाने त्यांना बोलण्याच्या नादात गुंतवित दुस-याने दागिने घेऊन पोबारा केला. त्यानंतर मुळे यांच्याशी बोलणा-यानेही तेथून पळ काढला. काही वेळाने दागिन्यांची चोरी झाल्याचे मुळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस काँस्टेबल रामनाथ सानप तपास करीत आहेत.