कोपरगावातील नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:09+5:302021-04-06T04:20:09+5:30
कोपरगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकरराव ...
कोपरगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधत कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्यावतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मंगळवारपासून खासगी रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार, असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
काळे म्हणाले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजहिताचा ध्यास घेणारे कोसाका उद्योग समूहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे यांची जयंती दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी केली जाते. याही वर्षी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने माजी खासदार काळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित मतदारसंघातील ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. जनसंपर्क कार्यालयात नागरिकांचे लस घेतल्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे.
नोंदणी झाल्यानतर तेथूनच कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व आत्मा मलिक हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच शहरातील साईबाबा तपोभूमी येथे दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. मतदारसंघातील ज्या गावातील रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सुरक्षा पुरवीत मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी या महारक्तदान शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहनदेखील काळे यांनी केले आहे.