संजीवनीच्या सभासद, कामगारांना मोफत कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:23+5:302021-03-23T04:21:23+5:30
कोपरगाव : येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सभासद व कामगारांना मोफत ...
कोपरगाव : येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सभासद व कामगारांना मोफत कोरोना लसीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक हाॅस्पिटल व संत जनार्दन स्वामी हाॅस्पिटल या ठिकाणी सभासद व कामगारांना ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी कारखाना कार्यस्थळावरून बसद्वारे उपरोक्त रुग्णालय येथे सभासद व कामगार यांना घेऊन जात आहे. याबरोबरच उद्योग समुहाच्यावतीने वर्षभर अनेक सामजिक उपक्रम राबविले जातात.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक संजय होन, कार्यकारी संचालक आर. के. सूर्यवंशी, सेक्रेटरी टी. आर. कानवडे, कामगार संघटनेचे मनोहर शिंदे, लेखाधिकारी एस. एन. पवार उपस्थित होते.
..............
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने कारखान्याचा अविभाज्य असलेले घटक असलेले सभासद व कामगारांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर वापरावे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे.
- विवेक कोल्हे, संचालक, जिल्हा सहकारी बँक.
..............