फुकटची वाळू... लिलाव टाळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:24+5:302021-03-25T04:20:24+5:30
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लिलाव प्रकियेकडे ठेकेदारांनी सपशेल पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठेकेदारांचा डोळा फुकटच्या वाळूवर असल्याचे ...
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लिलाव प्रकियेकडे ठेकेदारांनी सपशेल पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठेकेदारांचा डोळा फुकटच्या वाळूवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नदीपात्रात पाणी असल्याचे सांगत ठेकेदार एकीकडे लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवत आहेत, तर दुसरीकडे खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळू उपशाबाबतच्या नियमांची पुरती वाट लागली असल्याचे दिसते आहे. गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे लिलाव झाले नाहीत. जे काही लिलाव पूर्वी झालेले होते, त्या साठ्यांचा लिलाव कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे मातुलठाण येथील घाट वगळता सध्या कोणत्याही नदीपात्रातील रेतीघाटामधून वाळू उपसा करण्याला परवानगी नाही. तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे दिसते आहे. यंदा ९ जूननंतर कोणालाही वाळूचा उपसा करता येणार नाही.
------------
दोन साठ्यांचा लिलाव, १३ साठ्यांसाठी पाचवी फेरी
जिल्ह्यात १८ वाळू साठे लिलावायोग्य आहेत. त्यामध्ये ३ वाळू साठे हे शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे १५ घाटांसाठी जानेवारी-२०२१ मध्ये लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये मातुलठाण व सोनगाव-कोळगाव थडी येथील घाटांचे लिलाव झाले. त्यापैकी मातुलठाण येथून सध्या वाळूचा उपसा सुरू आहे, तर सोनगाव - कोळगाव थडी येथील नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने लिलाव झाला असला तरी संबंधित ठेकेदाराने वाळूघाट ताब्यात घेतलेला नाही. उर्वरित १३ वाळूघाटांसाठी लिलावाची पाचवी फेरी जाहीर करण्यात आली आहे. लिलावाला ठेकेदारांचा प्रतिसाद का मिळत नाही, की सर्वांनाच फुकटची वाळू हवी आहे किंवा एकाच ठेकेदाराचे सर्व घाटांवर वर्चस्व आहे, याबाबत आता शंका उपस्थित झाली आहे.
-----------------------
या वाळूसाठ्यांचा होईना लिलाव (कंसात परवानगी क्षमता)
वांगी (१६४६ ब्रास), नायगाव (५५५५ ब्रास), मातुलठाण १ (९२९३ ब्रास), मातुलठाण २ (५७८८ ब्रास), कोकमठाण - १ व संवत्सर (२१२० ब्रास), जेऊर कुंभारी व जेऊर पाटोदा (१९४८ ब्रास), राहुरी बु. (२३७५ ब्रास), पिंप्री वळण चंडकापूर (२३०७ ब्रास), वळण (६८९३ ब्रास), रामपूर (२५०४ ब्रास), सात्रळ (३७१० ब्रास), पुणतांबा (५००९ ब्रास), रस्तापूर (३३९२ ब्रास)
--------------
याला आहे मनाई
विहीत खोलीपेक्षा जास्त उत्खनन
खासगी जमिनीतून उपसा करणे
मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन करणे
वाळू काढण्यामुळे घरे, बांधकामांना धोका नको
यांत्रिक साधनांनी वाळू उपसा करणे
-------------------
हे अनिवार्य
लिलावधारकाकडे दैनंदिन नोंदी
सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत उत्खनन
वाळू डेपोमध्ये सीसीटीव्ही लावणे
वाळूघाटात सीमा निश्चित करून फलक लावणे
वाळू उपसा हाताने करणे (मॅन्यिुअल)
वाळू साठविण्याची जागा निश्चित असणे
नदीपात्रातून येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग, इतर मार्ग बंद करणे
लिलाव कालावधी संपल्यानंतर उपशाला परवानगी नाही
-------
काय आहे सीसीटीव्हीचा नियम ?
लिलाव घेतलेल्या वाळू घाटातील सीमा निश्चित करून तेथे फलक लावणे. वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॉमेरे लावणे. या सीसीटीव्हीचे फुटेज दर आठवड्याला प्रांताधिकारी व तहसीलदारांना सादर करणे. त्याची एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे अनिवार्य करण्यात आला आहे. लिलावात सहभाग घेतानाच या अटींचा उल्लेख आहे. मात्र, बारागाव नांदुर, मातुलठाम येथील सीसीटीव्ही फुटेज सध्यातरी प्रशासनाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्यथा हे फुटेज पाहूनच प्रशासनाने कारवाई करायला हवी होती. मात्र, केवळ चौकशीचे तोंडी आदेश देऊन प्रशासनानेही अवैध उपशाकडे डोळेझाक केल्याचे दिसते आहे.
--------
फोटो- वाळू