सेवानिवृत्त पोलिस अधिका-याने उभारले मोफत अभ्यासिका मंदीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:41 AM2018-06-24T11:41:05+5:302018-06-24T11:41:09+5:30
बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : ग्रामीण भागातील तरुणांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, देशासाठी चांगले अधिकारी, नागरिक घडावेत या भावनेने प्रेरित होऊन ...
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : ग्रामीण भागातील तरुणांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, देशासाठी चांगले अधिकारी, नागरिक घडावेत या भावनेने प्रेरित होऊन मुंबईतील सेवानिवृत्त आधिका-यानं मूळगावी अभ्यासिका उभारली. सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर ठवाळ यांनी आढळगाव येथे ४० लाख खर्च करून ‘अमित निवासी अभ्यासिका मंदीर’ उभारले आहे. हे केंद्र श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यामधील तरुणाईला मोफत उपलब्ध राहणार आहे.
मधुकर ठवाळ यांचे मुळ गाव आढळगाव. पण वडील बयाजी यांनी पोट भरण्यासाठी मुंबई गाठली. एका कापड मिलमध्ये नोकरी स्विकारली, त्यामुळे ठवाळ परिवार मुंबईकर झाला. मधुकर ठवाळ यांचे प्राथमिक शिक्षण आढळगाव मध्ये झाले. राहुरी कृषी विद्यापीठात बी. टेक. झाले. एम.पी.एस.सी. परिक्षा देऊन १९७९ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात दाखल झाले. सन २००९ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मधुकर ठवाळ सेवानिवृत्त झाले. त्यांनी चुलत बंधू अंकुश ठवाळ यांना पोलीस करण्यासाठी मार्गदर्शन केले. मधुकर ठवाळ यांचा नोकरीचा कार्यकाळ मुंबईत गेला. त्यामुले गावचा जनसंपर्क कमी झाला, पण गावचा जिव्हाळा कायम होता. हा जिव्हाळा पुन्हा वृध्दिंगत करण्यासाठी मधुकर ठवाळ यांनी आढळगाव मधील वडीलोपार्जीत जागेत निवासी अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला. या वास्तूचा आकर्षण प्लॅन तयार केला. याकामी अंकुश ठवाळ यांनी मोलाची साथ दिली
या केंद्रामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी सुमारे पाच हजार पुस्तके, नियतकालिके , वर्तमानपत्रे असा खजिना उपलब्ध केला. अभ्यासासाठी राहणा-या विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत व्यवस्थाही करण्यात आली आहे.
‘‘इच्छा पुर्ण झाली’’ - ठवाळ
मी परिस्थितीवर मात करून पोलिस अधिकारी झालो. मला दोन मुली, एक मुलगा. मुलगा खूप हुशार पण दुदैर्वान वीस वषापूर्वी अपघाती निधन झाले. तेव्हापासून मी समाजासाठी जगण्याचा निर्णय घेतला. दोन मुली, एक मुलगा दतक घेतला. अमित निवासी अभ्यासिका केंद्रामधून चांगले अधिकारी सेवक घडावेत एवढीच अपेक्षा आहे. - मधुकर ठवाळ, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी खूप अडचणी येतात. निवासी अभ्यासिका केंद्र सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. या मंदिरात तरुणाई घडेल असा विश्वास आहे. -बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदा