पारंपरिक लढाईत अपक्षांची उडी; काळे-कोल्हे यांच्यासमोर परजणे-वहाडणे यांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:37 PM2019-10-16T12:37:24+5:302019-10-16T12:37:56+5:30
कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबाच्या पारंपरिक लढतीचा मानला जातो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे गेली अनेक वर्ष या मतदार संघावर अधिराज्य होते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या भाजपकडून आमदार म्हणून निवडून आल्या.
कोपरगाव विधानसभा वार्तापत्र - रोहित टेके
कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबाच्या पारंपरिक लढतीचा मानला जातो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे गेली अनेक वर्ष या मतदार संघावर अधिराज्य होते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या भाजपकडून आमदार म्हणून निवडून आल्या.
यंदाच्या निवडणुकीत पुन्हा त्याच उमेदवार आहेत. याच मतदार संघात सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले अशोक काळे यांचे पुत्र आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करीत रिंगणात उतरले आहेत. राजेश परजणे व विजय वहाडणे यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने काळे-कोल्हे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या चार पंचवार्षिक निवडणुका या दोन घराण्यामध्येच रंगत असल्याचे चित्र होते. परंतु गेल्या नगरपालिका निवडणुकीत विजय वहाडणे यांनी प्रस्थापित काळे -कोल्हे या दोन्ही घराण्यांना बाजूला सारत नगराध्यक्ष पद मिळविले. वहाडणे हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे पूत्र आहेत. यंदाच्या निवडणुकीत या दोनही घराण्यांच्या विरोधात ते पुन्हा दंड थोपटत मैदानात उतरले आहेत.
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची सासुरवाडी असलेले दिवंगत नामदेवराव परजणे यांचे घराणे गेल्या वीस वर्षांपासून आमदारकीच्या लढतीपासून अलिप्त होते. या घराण्यातील राजेश परजणे
आता मैदानात आहेत. लढत चौरंगी झाल्याने अंदाज बांधणे अवघड झाले आहे.
शहरासाठी भाजप सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला. निळवंडेच्या पाणी प्रश्नासाठी आपण पाठपुरवा केला ही मांडणी आमदार स्रेहलता कोल्हे सभांतून करत आहेत.
आमदारांना पाणी प्रश्न सोडविता आला नाही. तालुक्यातील रस्ते, रोजगार याचे प्रश्न प्रलंबित आहेत. विकास फक्त बॅनरवर दिसतो, अशी टीका आशुतोष काळे करत आहेत.
राजेश परजणे हे शेतक-यांचे प्रश्न, रोजगार निर्मिती व पाणी प्रश्नावर सभांमधून मांडणी करत आहेत. प्रस्थापितांना एवढी वर्षे संधी दिली. मला एकदा द्या, असे आवाहन ते करत आहेत.
विजय वहाडणे हे भाषणांतून प्रस्थापितांवर टीका करत आहेत. काळे-कोल्हे या दोन्ही घराण्यांनी तालुक्याचे शोषण केले, असे त्यांचे म्हणणे आहे.