आवर्तन स्थगितीमुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:19+5:302021-05-09T04:21:19+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, अथवा आवर्तन सोडू नये, अशा मागणीची याचिका जुन्नर तालुक्यातील शेतकरी ...
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, अथवा आवर्तन सोडू नये, अशा मागणीची याचिका जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. गुरुवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने कालवा सल्लागार समितीच्या आवर्तन सोडण्याबाबतच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. त्यामुळे नगर, सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक शेतकरी धास्तावले आहेत. पुढील सुनावणी १२ मे रोजी होणार असून यावेळी न्यायालयात शेतकऱ्यांच्या वतीने भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांनी माहिती संकलन करण्यास सुरुवात केली आहे.
९ एप्रिल रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयातून कुकडी प्रकल्पातील पुणे जिल्ह्यातील कालव्यासाठी २.९ टीएमसी तर नगर, सोलापूरसाठी ३.५ टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील आवर्तन पूर्ण झाले. नगर, सोलापूरकरांना ९ मेपासून आवर्तन देण्याची तयारी सुरू होती. त्यातच प्रशांत औटी यांनी न्यायालयात धाव घेतली.
कालवा सल्लागार समितीच्या निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. पाणी मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात लाभक्षेत्रातील फळबागा, ऊस पिके संकटात सापडली आहेत. पाणी न मिळाल्यास फळबागांचे मोठे नुकसान होईल.
---
पाचपुतेंचा पाटील, पवार, लंके यांच्याशी संवाद
कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती मिळाल्यानंतर बबनराव पाचपुते यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके यांच्याशी संवाद साधला. न्यायालयात सरकारला भक्कमपणे बाजू मांडण्याचा सल्ला दिला.
---
सत्ताधारी सदस्यांना होती कल्पना..
जुन्नरचे प्रशांत औटी कुकडीच्या आवर्तनाबाबत न्यायालयात जाणार आहेत. तेव्हा तुम्ही तुमची बाजू मांडा अथवा लक्ष द्या, अशी माहिती कुकडीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सत्ताधारी पक्षातील कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांना दिली होती. मात्र, कोरोनाच्या महामारीत सदस्यांनी याकडे लक्ष दिले नाही, असे समजते.
----
कुकडी पाणी प्रश्नावर बोलणारे आणि निवेदने देऊन आपण मोठे आहोत, अशी स्वप्न रंगवतात; पण अशा नेत्यांमुळे पाणी प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होत चालला आहे. आता सरकारने चांगला वकील देऊन स्थगिती उठवावी, अन्यथा आंदोलन करणार आहे.
-बबनराव पाचपुते,
सदस्य, श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघ
----
शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार
कुकडीच्या आवर्तनावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. दि. १२ ला सुनावणीही होणार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडणार आहे. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, न्याय मिळेल. आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत, असे माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले.
---
न्यायालयाने कुकडीच्या चालू आवर्तनावर स्थगिती देताना दोन्ही बाजू तपासणे आवश्यक होते. सल्लागार समितीच्या सदस्यांनी वेळीच याबाबत नियोजन करणे आवश्यक होते. दि. १२ ला नामांकित वकील देऊन न्यायालयात नगरकरांची बाजू मांडणार आहेत.
-बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के
श्रीगोंदा
--
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी कुकडीच्या आवर्तनाबाबत बोलणे झाले होते. मात्र, आता न्यायालयीन पेच निर्माण झाला. दि. १२ ला सरकार आपली बाजू मांडेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
- अनुराधा नागवडे,
सदस्या, जिल्हा परिषद
---
कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रशांत औटी न्यायालयात जाणार हे माहीत होते. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही. न्यायालयात बाजू मांडली नाही. आता नौटंकीपणा सुरू केला आहे. कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी सदस्य पदाचे राजीनामे देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
-मारुती भापकर,
सामाजिक कार्यकर्ते