चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 08:58 AM2024-12-01T08:58:30+5:302024-12-01T08:58:42+5:30
चेष्टा सहन न झाल्याने तरुणाने रागातच काऊंटरवर ठेवलेली कात्री हातात घेऊन जिशानच्या पाठीत सपासप वार केले.
Ahilyanagar Crime: चेष्टामस्करी केल्याच्या रागातून कात्रीने पाठीवर सपासप वार करत मित्रानेच मित्राचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात घडली. जिशान रुस्तुमअली खान (वय १८, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मुकुंदनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
शमद्दीन निजाद्दीन खान (रा. इस्लामी बेकरीजवळ, दर्गादायरा रोड, शहाजीनगर, मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नसीबअली रुस्तुमअली खान यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा भाऊ जिशान व त्याचे मित्र रेहान अब्दुलहक शेख, फैजल साहेबरावअली खान, शमद्दीन निजामद्दीन खान (सर्व रा. मुकुंदनगर) असे चौघे रेहान शेख यांच्या जिलानी मेडिकलसमोर गप्पा मारत बसलेले होते. ते एकमेकांची चेष्टामस्करी करत होते. जिशान व त्याचा मित्र रेहान असे दोघेजण मेडिकलमध्ये काऊंटरच्या आतील बाजूला उभे होते, तर फैजान व शमद्दीन हे बाहेर उभे होते. त्यांची चेष्टामस्करी सुरू होती. चेष्टा केल्याचा शमद्दीन यास राग आला. या रागातच त्याने काऊंटरवर ठेवलेली कात्री हातात घेऊन जिशानच्या पाठीत सपासप वार केले. रेहान व फैजान अशा दोघांनी भांडण सोडविले. त्यावेळी जिशानच्या पाठीतून रक्तस्राव होत होता. तो तसाच घरी गेला. घरी आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्याला नातेवाइकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर, शुक्रवारपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जिशानचा शनिवारी (दि.३०) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी धाव घेत मेडिकलची तपासणी केली.
दहा तास मृत्यूशी झुंज
मृताचे भाऊ नसीबअली खान हे शुक्रवारी सायंकाळी कामावरून घरी येत होते. त्यांना पत्नीचा फोन आला. ते तातडीने घरी गेले असता जिशानने घडलेला सर्व प्रकार सांगितला. कात्रीचे वार खोलवर गेल्याने पाठीतून रक्तस्राव होत होता. ही बाब भाऊ नसीबअली यांच्या निदर्शनास आली. त्यांनी जिशानला रुग्णालयात दाखल केले. जिशान शनिवारी सकाळपर्यंत मृत्यूशी झुंज देता होता. मात्र, सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्याने प्राण सोडला. जिशानच्या मृत्यूची वार्ता मुकुंदनगर परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान, पोलिसांचा फौजफाटाही रुग्णालयात दाखल झाला.