रोहित पवारांच्या कार्यालयासमोर मदारी समाजाचे गारूड्यांचा खेळ करुन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:27 PM2020-10-19T13:27:58+5:302020-10-19T13:29:55+5:30
खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी समाजाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याच्या खेळ सादर करुन आंदोलन केेले.
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी समाजाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याच्या खेळ सादर करुन आंदोलन केेले. त्यानंतर तहसीलसमोर पाल ठोकून ठिय्या आंदोलन केले. या वसाहतीसाठी दोन वर्षापूर्वी ८८ लाख निधी आला. तरी काम झाले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आ. रोहीत पवार यांच्या कार्यालयासमोर सकाळी साडेअकराच्या सुमारास वंचीत बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरूण जाधव, बापूसाहेब ओहोळ, विशाल पवार, द्वारका पवार, योगेश सदाफुले, अतिष पारवे, संतोष चव्हाण, हुसेन मदारी, फकीर मदारी, सरदार मदारी व सलीम मदारी कुटुंबासह आले होते. यावेळी मदारी समाजातील हुसेन मदारी म्हणाले खर्डा येथील बाजारतळावर गेल्या ५० वर्षांपासून अनेक गरीब मदारी समाज बांधव गोधडीचे पाल टाकून राहत आहेत. त्यांना व त्यांच्या मुला बाळांना अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा संकटात जीव मुठीत धरून राहावे लागते. कचरा व भंगार गोळा करून कशी बशी आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवितात. वन्य जीव संरक्षक कायद्यातील जाचक अटीमुळे माकड व सापाचा खेळ करण्याचा पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला घरे बांधून द्यावेत अशी मागणी केली. यानंतर गारुड्याचा खेळ चालू केला. तासाभराच्या आंदोलनानंतर तहसीलदार कार्यालयासमोर पाल ठोकून ठिय्या दिला. |