झोपडपट्टीधारकांचा राहुरी नगर परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:27 PM2018-01-19T15:27:16+5:302018-01-19T15:28:25+5:30
झोपडपट्टीधारकांची शासन दप्तरी नोंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
राहुरी : झोपडपट्टीधारकांची शासन दप्तरी नोंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका-यांशी पत्र व्यवहार करून येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी दिली.
श्रमिक संघाचे अध्यक्ष शरद संसारे व सचिव मदिना शेख यांच्या नेतृत्वाखाली मल्हारवाडी रोड परिसरातील झोपडपट्टीधारकांनी राहुरी नगर परिषदेवर घोषणा देत मोर्चा काढला. राहुरी नगर परिषदेने दप्तरी नोंद केल्यास महसूल वाढणार आहे. तीस वर्षापासून झोपडपट्टीधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रश्न सुटल्याशिवाय झोपडपट्टीधारक शांत बसणार नाही, असा इशारा संघाचे अध्यक्ष शरद संसारे यांनी दिला.
मोर्चासमोर बोलताना सचिव मदिना शेख म्हणाल्या, मल्हारवाडी रोड परिसरात झोपडपट्टीधारक अनेक वर्षांपासून राहत आहेत. झोपडपटटीवाशियांची दप्तरी नोंद करावी व भूमीगत गटार करावी, झोपडपट्टीधारकांना शासनाने भविष्यकाळात पक्की घरे बांधून द्यावीत, अशी मागणीही शेख यांनी केली. यावेळी डॉ. जालिंदर घिगे, माजी उपनगराध्यक्ष राऊसाहेब तनपुरे, बाळासाहेब उन्डे, नगरसेवक भिकूशेठ भुजाडी, विलास तनपुरे, फिरोज शेख, सतीश जाधव, शकुंतला हारदे, सोमनाथ कांबळे, विकास बोरूडे, मंगल शिरसाट, सतीश जाधव, कविता पवार, लता कुवळेकर आदी उपस्थित होते.