मोर्चा, रास्ता रोको
By Admin | Published: August 8, 2014 11:42 PM2014-08-08T23:42:09+5:302014-08-09T00:21:36+5:30
शेवगाव : तहसील कार्यालयावरअचानक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेवगाव : टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव येथे शुक्रवारी ‘मनसे’च्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन शेवगाव-पैठण मार्गावर अचानक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळीपरिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांबरोबर माणसांवर ऐन पावसाळ्यात भटकंतीची वेळ आली आहे. पाण्याच्या टँकरला डिझेल मिळत नाही, मृत माणसालाही पाजण्यासाठी पाणी मिळत नाही, असे निदर्शनास आणून देत ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांंनी तालुक्यातील भीषण दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, गणेश गर्जे यांचीही भाषणे झाली.
शेवगाव, पाथर्डी हे तालुके दुष्काळी जाहीर करावे, बीड-परळी रेल्वेमार्ग मार्गी लावावा, इंधन दरवाढ कमी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेवगावचे तहसीलदार हरिष सोनार, शेवगाव तालुका कृषी अधिकारी अंबादास नाकाडे यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात माणिकराव गर्जे, गोकुळ भागवत, आबासाहेब सपकाळ, अमोल पालवे, सतीश मगर, संजय वणवे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(तालुका प्रतिनिधी)
अचानक रास्ता रोको
शेवगाव येथील आंबेडकर चौक ते मोची गल्ली, शिवाजी चौक ते तहसील कार्यालयावर ‘मनसे’च्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील समोरील शेवगाव-पैठण मार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे या मार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.