उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा
By Admin | Published: September 12, 2014 10:59 PM2014-09-12T22:59:16+5:302024-03-18T18:04:35+5:30
पाथर्डी : महिला रुग्णाच्या मृत्युला वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन तालुक्यातील आगसखांड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा नेऊन वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरले.
पाथर्डी : महिला रुग्णाच्या मृत्युला वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन तालुक्यातील आगसखांड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा नेऊन वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरले. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली.
मोर्चा पोलिसांनी अडविला
पाथर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी उपजिल्हा रूग्णालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात माजी नगराध्यक्ष अॅड. दिनकर पालवे, साहेबराव रंधवे, सर्जेराव रंधवे, अफ्रुकाबाई रंधवे यांच्यासह मयताचे नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणा देत मोर्चा उपजिल्हा रूग्णालयावर गेल्यानंतर तो पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच अडविला.
नातेवाईकांचा आरोप
रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे शोभा रंधवे या महिलेचा मृत्यू झालेला आहे, रूग्णांकडे लक्ष देण्यात आलेले नाही तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधे आणण्याची सक्ती केली जाते, असा आरोप मयत शोभा हिचे नातेवाईक व ग्रामस्थांनी केला.
गावात तापाची साथ
आगसखांड गावात सध्या तापेची साथ असून गावातील सुमारे ५० रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत असे मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून देत पाण्याचे नमुने तपासण्याची मागणी केली. डॉ.मनिषा खेडकर यांनी मोर्चेक-यांना शांत केले. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या.
(तालुका प्रतिनिधी)
आरोपात तथ्य नाही
मयत शोभा रंधवे हिच्या मेंदूमध्ये ताप गेल्यामुळे ती बेशुध्द झाली. तिच्या अंगात अनेक दिवस ताप मुरला. मी स्वत: रुग्णाला रूग्णवाहिकेतून नगरला घेऊन गेलो. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला या ग्रामस्थांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. रूग्णालयाची यामध्ये कोणतीही चूक नाही.
- डॉ. पी. आर. शिरसाट
वैद्यकीय अधीक्षक
रुग्णालयात दाखल करण्यास विलंब
मयत शोभा रंधवे काही दिवसांपासून तापाने आजारी होती. प्राथमिक उपचारानंतर तिला नऊ सप्टेंबर रोजी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला नगरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. व त्याच दिवशी तिला नगरला हलविण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच दुसऱ्या दिवशी दहा सप्टेंबर रोजी तिचे निधन झाले. मयत शोभाला रुग्णालयात उशिराने दाखल करण्यात आल्याने उपचाराची संधी मिळाली नाही, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी.आर. शिरसाट यांचे म्हणणे आहे.