वारंवार बंद पुकारून वेठीस धरणारांविरोधात राहुरीत व्यापा-यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:34 PM2018-02-02T16:34:46+5:302018-02-02T16:34:54+5:30
वारंवार बंद पुकारून व्यापा-यांना वेठीस धरणारांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.
राहुरी : वारंवार बंद पुकारून व्यापा-यांना वेठीस धरणारांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. तक्रार दिल्यानंतर संबंधीतांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
राहुरी येथील शुक्लेश्वर मंदीरापासून मोर्चास सुरूवात झाली. मोर्चा तहसील कचेरीत पोहचल्यानंतर निवासी तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चासमोर बोलताना राहुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून कोणतीही पुर्वसुचना न देता व्यापा-यांना त्रास देऊन बंद पाळले जातात. व्यापा-यांकडून जबरदस्तीने देणग्या वसुल केल्या जातात. धाक दाखवून व्यापा-यांचे नुकसान केले जाते. लटमार, दुकान फोडी व धाक दाखवून दमदाटी करणा-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रकाश पारख यांनी केली.
व्यापार करणे राहुरीत अवघड झाले आहे अशा परिस्थीतीत बंद करून वसुली करणा-यांवर कडक कारवाई करण्याची गरज सुर्यकांत भुजाडी यांनी व्यक्त केली. राजेंद्र दरक, देवेंद्र लांबे, प्रमोद सुराणा यांची भाषणे झाली. यावेळी विलास तरवडे, कांता तनपुरे, वैभव धुमाळ, रविंद्र उदावंत, अनिल भटटड, अखतर कादरी, प्रसाद कोरडे, काशिनाथ खेडेकर, नंदुशेठ भटटड, मोहन जोरी, चंद्रकांत उन्डे, सलीमभाई शेख यांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले.
व्यापा-यांनी तक्रार केल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल. क़ुणाचीही गय केली जाणार नाही. मात्र व्यापा-यांनी पुढे आले पाहीजे. चो-या करणा-यांच्या मुस्क्या आवळल्या आहे. चोरांसाठी जेल अपुरा पडला आहे. वहातुकीचीही कोंडी फोडली जाईल.
-प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक राहुरी