बिनशर्त पाठिंबा की महापौरसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:59 PM2019-06-04T16:59:57+5:302019-06-04T17:04:09+5:30
राज्यात भाजप मोठा भाऊ असला तरी अहमदनगर महापालिकेत मात्र सेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे़
अहमदनगर : राज्यात भाजप मोठा भाऊ असला तरी अहमदनगर महापालिकेत मात्र सेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे़ पण, मोठ्या भावाचा मान सेनेला महापौर निवडणुकीत मिळाला नाही़ लोकसभा निवडणुकीतील यशामुळे सेनेच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत़ मात्र आधी लगीन विधानसभेचे नंतर महापालिकेचे, अशी भूमिका सेना नेतृत्वाची आहे़ त्यामुळे महापालिकेत भाजपाला तूर्तास बिनशर्त पाठिंबा द्यावा की महापौर पदासाठी मोर्चेबांधणी करावी, असा पेच शिवसेनेसमोर आहे़
महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाचे शहरातील नेते एकमेकांपासून दुरावले होते़ महापालिकेत २४ जागांवर विजय मिळवित सेना सत्तेच्या जवळ पोहोचली़ मात्र, भाजपने सेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली.़ तेव्हापासून सेना-भाजपाचे विळ्या भोपळ्याचे नाते झाले. लोकसभा निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची किमया डॉ़ सुजय विखे यांनी साधली़ त्यामुळे नगर शहरातून त्यांना मताधिक्य मिळाले़ भाजपाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने सेनेत उत्साह संचारला आहे़ सेनेने लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म पाळला़ तो आता भाजपनेही पाळावा़ महापालिकेतील राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपने सेनेशी मैत्री करावी, अशी दोन्ही पक्षांतील नेत्यांची इच्छा आहे़ त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्नही सुरू आहेत़ स्थानिक पातळीवर मात्र मतभेद आहे़ युतीचा धर्म पाळायचा झाल्यास भाजपला महापौर पदाचा राजीनामा देऊन सत्तेच्या चाव्या सेनेच्या हाती द्याव्या लागतील़ पण, भाजप नेतृत्वाला ते मान्य होईल का आणि तसे झालेच तर महापौर पदाचा उमेदवार कोण, याबाबत सेनेत एकी होईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे़ त्यात शहर विधानसभेची जागा सेनेकडे
आहे़ या निवडणुकीची तयारी सेनेने सुरू केली आहे़ ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापौर पदासाठी भाजप नेतृत्वाकडे पाठपुरावा करावा किंवा नाही, अशा व्दिधा मनस्थितीत सेना आहे़
महापालिकेत राष्ट्रवादीला बरोबर घेऊन भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली़ परंतु, लोकसभा निवडणुकीत समीकरणे बदलली़ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्यात लढत झाली़ विखे यांनी आमदार जगताप यांचा पराभव केला़ या निवडणुकीच्या निमित्ताने विखे यांचा शहराच्या राजकारणात प्रवेश झाला़
सेनेचे उपनेते अनिल
राठोड यांनी विखे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली़ त्याची परतफेड विखे कशी करतात, ते पाहावे लागेल़
लोकसभा निवडणुकीत सेनेने युतीचा धर्म पाळला़ त्यामुळे भाजपने युतीचा धर्म पाळत महापौर पदाचा राजीनामा देऊन सेनेच्या सत्तेचा मार्ग मोकळा करावा़
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी राजीनामा दिल्यास सेनेचा महापौर शक्य आहे़ परंतु, वाकळे राजीनामा देणार का, त्यांनी राजीनामा न दिल्यास सेना अविश्वास आणू शकते का, अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आले आहे़
सेना-भाजपच्या पारड्यात जनतेने मते टाकलेली आहेत़ त्याचा आदर ठेवून सेना-भाजपच्या नेत्यांनी पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे़ -भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गाºहाणे मांडलेले आहे़ त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे़ -दिलीप सातपुते, शहरप्रमुख, शिवसेना