एफआरपीचा ८०-२० फॉर्म्युला अमान्य :रघुनाथदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:55 PM2018-12-16T17:55:58+5:302018-12-16T17:56:01+5:30
कायद्याची मोडतोड करून भाजप सरकार व साखर कारखानदार एकरकमी एफआरपीचे तुकडे करून ८० टक्के आधी व २० टक्के पैसे नंतर देण्याचा एफआरपीचा ८०-२० असा नवीन फॉर्म्युला आणू पाहत आहेत.
रमेश शिंदे
पाचेगाव : कायद्याची मोडतोड करून भाजप सरकार व साखर कारखानदार एकरकमी एफआरपीचे तुकडे करून ८० टक्के आधी व २० टक्के पैसे नंतर देण्याचा एफआरपीचा ८०-२० असा नवीन फॉर्म्युला आणू पाहत आहेत. त्यास आमचा विरोध आहे. या एफआरपी फॉर्म्युलाला ऊस पट्टयातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करावा. शेतकरी विरोधात हे सरकार वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना पर्याय म्हणून शेतकरी संघटना महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका लढविणार आहे, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.
गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे शेतक-यांच्या बैठकीसाठी जाताना ते शुक्रवारी नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे शेतकºयांच्या आग्रहास्तव थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शिवाजीनाना नांदखिले हे नेते उपस्थित होते.
‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, शेतक-यांच्या संमतीशिवाय ऊस बिलाच्या रकमेतून कर्जवसुली होता कामा नये. होणारी वसुली जिल्ह्यातील कारखान्यांनी थांबविली पाहिजे. काँग्रेस सरकारने शेतकरीविरोधी धोरणे, कायदे केले. आताचे भाजप सरकार ते राबविण्याचे प्रयत्न करीत आहे. १०० टक्के एफआरपीसाठी कारखानदार व सरकार विरोधात शेतकºयांनी लढा उभारावा. महाराष्ट्रातील दरवर्षी पडणारे दुष्काळ हे काँग्रेस व भाजप सरकारचा नाकर्तेपणा आहे. साखर कारखाने, बाजार समिती, दूध संघ यांच्यावर कोणतीही कारवाई राज्य सरकारकडून होत नाही, याचा अर्थ असा आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजप-शिवसेना सरकारला छुपा पाठिंबा आहे. यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शेतक-यांसाठी पर्याय उभा करणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात शेतकºयांच्या उसाच्या एफआरपीच्या रकमेचे तुकडे करू पाहणारे शेतक-यांच्या नावाने चळवळ उभी करू पाहत आहे. हे नेते गवतातील हिरवे साप आहेत, अशी टीका पाटील यांनी अनिल घनवट यांचे नाव न घेता यावेळी केली. रघुनाथदादा पाटील यांचा नेवासा तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाप्रमुख हरिभाऊ तुवर, संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव तुवर, भास्कर तुवर, कैलास पवार, भगीरथ पवार, कर्णासाहेब तुवर, अभय तुवर आदी शेतकरी उपस्थित होते.