पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:51 AM2021-01-13T04:51:02+5:302021-01-13T04:51:02+5:30
जामखेड : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्याला जामखेड पोलिसांनी पुणे ...
जामखेड : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्याला जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली.
रामकिसन उत्तम साठे (वय ५०, रा. जवळके, ता. जामखेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामकिसन याला सेशन कोर्ट, अहमदनगर यांनी ३०२च्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना रामकिसन हा आपल्या मूळगावी जवळके येथे पॅरोलवर सुटला होता. पॅरोलची रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यावरून येरवडा जेल येथील पोलिसांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दिनांक ७ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना रामकिसन हा विठ्ठलवाडी, देहू रोड, ता. हवेली, जि. पुणे येथे आपली ओळख लपवून राहात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी पुणे पोलिसांच्या मदतीने याठिकाणी सापळा रचून रामकिसन साठे याला ताब्यात घेतले. दिनांक ८ जानेवारी रोजी त्याला जामखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने पुन्हा एक वर्षाची शिक्षा सुनावली.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत, पो. कॉ. शिवलिंग लोंढे, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे (पुणे) यांच्या मदतीने केली.