मुंबईच्या कलिंगड व्यापा-यांच्या खुनातील फरार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:15 AM2020-06-05T11:15:00+5:302020-06-05T11:15:44+5:30
मुंबईच्या कलिंगड व्यापा-याच्या खुनातील फरार आरोपी नंदू तुकाराम पारे (वय २७) यास पोलिसांनी २ जून रोजी शिरुर (जि.पुणे) परिसरात पकडले. हा आरोपी दोन वर्षापासून फरार होता.
जामखेड : मुंबईच्या कलिंगड व्यापा-याच्या खुनातील फरार आरोपी नंदू तुकाराम पारे (वय २७) यास पोलिसांनी २ जून रोजी शिरुर (जि.पुणे) परिसरात पकडले. हा आरोपी दोन वर्षापासून फरार होता.
आरोपी नंदू पारे हा २ जून रोजी कारेगाव ( ता. शिरूर जि. पुणे) येथे टेम्पोने प्रवास करीत होता. त्याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने टेम्पोतून उडी मारून पळू लागला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या पथकाने त्यास झडप घालून पकडले.
२० मे २०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हासन उमर शेख (वय ५०) यांचा दोरीने गळा आवळून त्याने खून केला होता. प्रेताची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह खेड (ता. कर्जत) कर्जत येथील भीमा नदीपात्रात पुरावा नाहिसा करण्याच्या उद्देशाने टाकून दिला होता. व्यापा-यांने विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलीक भोरे ( रा.कवडगाव, ता. जामखेड), अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, नंदू तुकाराम पारे ( सर्व रा.पारेवाडी, ता. जामखेड) यांनी संगनमत करून हा खून केला होता.
याबाबत कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक ही करण्यात आली होती. यातील आरोपी नंदू पारे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.