कोरोनाच्या संकटात रेखाचित्रांव्दारे पी.एम.केअरसाठी निधी संकलन, प्रमोद कांबळे यांची कलेतून सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:56 PM2020-04-16T12:56:46+5:302020-04-16T12:56:58+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून या संकटात सरकारच्या प्रयत्त्नांना साथ देण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघही सुरु झाला आहे. या काळात अनेक उद्योजकांपासून बॉलीवूड स्टारही सढळ हाताने देणग्या देत आहेत. त्याचवेळी अहमदनगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून पी.एम.केअर फंडासाठी निधी संकलन सुरु केले आहे. प्रमोद कांबळे यांनी रेखाचित्रे काढून त्यापोेटी जमणारा निधी पी.एम.केअर फंडात जमा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

Fundraising for PMcare through the Drawings of Corona Crisis, Pramod Kamble's Social Commitment | कोरोनाच्या संकटात रेखाचित्रांव्दारे पी.एम.केअरसाठी निधी संकलन, प्रमोद कांबळे यांची कलेतून सामाजिक बांधिलकी

कोरोनाच्या संकटात रेखाचित्रांव्दारे पी.एम.केअरसाठी निधी संकलन, प्रमोद कांबळे यांची कलेतून सामाजिक बांधिलकी

अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून या संकटात सरकारच्या प्रयत्त्नांना साथ देण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघही सुरु झाला आहे. या काळात अनेक उद्योजकांपासून बॉलीवूड स्टारही सढळ हाताने देणग्या देत आहेत. त्याचवेळी अहमदनगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून पी.एम.केअर फंडासाठी निधी संकलन सुरु केले आहे. प्रमोद कांबळे यांनी रेखाचित्रे काढून त्यापोेटी जमणारा निधी पी.एम.केअर फंडात जमा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

यासाठी त्यांनी देशासह परदेशातील भारतीयांनाही आवाहन केले आहे. ईमेल,व्हॉटसअपमार्फत त्यांच्यापर्यंंत फोटो पोहोच केल्यास कांबळे हुबेहुब रेखाचित्र (स्केच) काढून देणार आहेत. यासाठी किमान 5 हजार रुपये देणगीमूल्य आकारण्यात येईल. या स्केचचा फोटो संबंधितांना ई मेल, सोशल मिडियातून पाठविण्यात येणार आहे. लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष स्केच संबंधितांना मिळण्याची व्यवस्था केली जाईल. कांबळे यांनी यापूर्वीही राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगात अशा पध्दतीने आपल्या कलेच्या माध्यमातून निधी संकलन करून सरकारजमा केला आहे. कोरोनाच्या या जागतिक स्तरावरील आपत्तीतही त्यांच्यातील संवेदनशील कलाकाराचे प्रत्यंतर या उपक्रमातून येत आहे.
प्रसिध्द चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे हे त्यांच्या कलेइतकेच सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखले जातात. महाराष्ट्रातील किल्लारी भूकंप, काश्मिरमधील पूरपरिस्थिती, कारगिल युध्द अशा आपत्तीप्रसंगात त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून असेच निधी संकलन करून रिलिफ फंडात योगदान  दिले होते.  या उपक्रमांना वेळोवेळी मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आताही लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कलासेवेच आपले काम चालूच ठेवत या माध्यमातून मदत निधी संकलनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती रतन टाटा, भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांची रेखाचित्रे लॉकडाऊन काळात साकारली आहे. या उपक्रमात सर्वांनाच सहभागी होवून आपले किंवा आपल्या प्रियजनाचे सुंदर रेखाचित्र काढून घेता येईल. यासाठी  किमान पाच हजार रुपये देणगीमूल्य देता येईल. हि सर्व देणगी एकत्र करून ती पी.एम.केअर फंडात जमा करण्यात येणार आहे. केवळ  भारतातीलच नव्हे तर  जगभरात विखुुरलेल्या भारतीयांंनाही या कलात्मक उपक्रमातून संकट काळात देशवासियांसाठी मदतीचा हात देता येईल. 

------------------

आपत्तीत मदतीचे मोल खूप अनमोल असते
आपत्तीच्या काळात समाजाकडूून मिळणारी मदत खूप अनमोल असते. सध्या टिव्हीवर रामायण सिरियल पुन्हा दाखविण्यात येत आहे. रावणरुपी दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी रामाने सेतू बांधताना अनेकांनी योगदान दिले. अगदी खारुताईनेही चिमुट चिमुट माती टाकल्याचा रामायणात उल्लेख आहे. आज देशाला अशाच मदतकर्त्यांची गरज आहे. एक कलाकार म्हणून मी कलेच्या माध्यमातून योगदान देवू शकतो. या प्रयत्नांना समाजाचा चांगला प्र्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. आपली कलासाधना देशावरील संकटात कामी आली यासारखे दुसरे समाधान असूच शकत नाही, अशा भावना प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केल्यात.

Web Title: Fundraising for PMcare through the Drawings of Corona Crisis, Pramod Kamble's Social Commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.