साखर हंगामाची भट्टी पेटली; १०० टक्के एफआरपी अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 05:30 PM2017-10-13T17:30:28+5:302017-10-14T14:07:13+5:30
अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही.
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामास सुरूवात आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची भट्टी पेटली आहे.
दसºयापासूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा बॉयलर पेटण्यास सुरूवात झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही. या कारखान्याने देखील गाळपासाठी आयुक्तांकडे परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे या हंगामात जिल्ह्यातील हे सर्व २३ कारखाने सुरू होणार आहेत. आतापर्यंत अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना, लोणीचा पद्मश्री विखे सहकारी साखर कारखाना, विखे कारखान्याने भागिदारी तत्वावर चालविण्यासाठी घेतलेला राहाता तालुक्यातील गणेश, राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना, प्रसाद खाजगी कारखाना, नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखाना, संगमनेरचा थोरात सहकारी कारखाना, कोपरगावचा संजीवनी व काळे सहकारी कारखाना, पाथर्डीचा वृद्धेश्वर सहकारी कारखाना, पारनेरचा भाडे तत्वावरील क्रांती शुगर, जामखेडचा अंबालिका, जय श्रीराम, श्रीगोंदा तालुुक्यातील साईकृपा-१ (देवदैठण), शेवगाव तालुक्यातील गंगामाई खाजगी कारखाना यांचा बॉयलर पेटला आहे. रविवार १५ आॅक्टोबरला श्रीगोंदा सहकारी कारखाना, भाडे तत्वावरील नगर तालुक्यातील पियुष या कारखान्यांचा बॉयलर पेटणार आहे.
१०० टक्के एफ. आर. पी. अदा
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २३ साखर कारखान्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे त्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकरी सभासदांना उसाची किमान आधारभूत किंमत (एफ. आर.पी.) पूर्णपणे अदा केली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतक-यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकविल्याने या कारखान्यावर जप्तीची नामुष्की ओढावली होती. पण या कारखान्यानेसुद्धा थकबाकी अदा केली आहे. त्यामुळे हा कारखाना या हंगामात उसाचे गाळप करण्यास सज्ज झाला असून त्यासाठी त्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
आणखी दोन खाजगी कारखाने
जिल्ह्यात साखर कारखाने उदंड झाले असताना आणखी दोन नवीन खाजगी साखर कारखान्यांची यात भर पडणार आहे. एक कारखाना संगमनेर तालुक्यात होत असून दुसरा कारखाना नेवासा तालुक्यात होत आहे. संगमनेरच्या कारखान्याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.