राहात्यात महाविकास आघाडीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:00+5:302021-01-19T04:23:00+5:30
राहाता : ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गटाने २५ पैकी २३ ग्रामपंचायतींवर सत्ता हस्तगत केली आहे. फक्त दोन ग्रामपंचायतींवर अपयश ...
राहाता : ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गटाने २५ पैकी २३ ग्रामपंचायतींवर सत्ता हस्तगत केली आहे. फक्त दोन ग्रामपंचायतींवर अपयश आले. तालुक्यात महाविकास आघाडीचा फज्जा उडाला.
राहाता तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ६ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. १९ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूक निकालात लोणी खुर्द व शिंगवे या दोन ग्रामपंचायती वगळता १७ ग्रामपंचायतींवर विखे गटाने कमळ फुलविले. यात अस्तगाव ग्रामपंचायत नांदूर, रामपूरवाडी, एकुरखे, ममदापूर, जळगाव, आडगाव बु, गोगलगाव, पाथरे बु, रांजनगाव खु, केलवड, हसनापूर, चंद्रपूर, हणमंतगाव, बाभळेश्वर, पिंपळवाडी या ग्रामपंचायतींत विखे-पाटील यांच्याच दोन गटांत लढत होऊन सत्ता कायम राखण्यात यश मिळाले.
शिंगवे ग्रामपंचायतीत विखे गट व आमदार आशुतोष काळे गटाची युती असताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाने ८ जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेत येथे सत्तांतर घडविले. लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीत २० वर्षांनंतर सत्तांतर झाले. विखे गटाच्या ताब्यातील ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे जनार्दन घोगरे यांच्या गटाने ११ जागा जिकूंन ताब्यात घेतली, तर विखे गटाला अवघ्या सहा जागा मिळाल्या.
बाभळेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राऊसाहेब म्हस्के यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत विखे गटाने १४ जागा जिंकून सत्ता खेचून आणली. म्हस्के गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून म्हस्के गटाचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. राष्ट्रवादीच्या भास्करराव फणसे गटाच्या १० वर्षांपासून ताब्यात असलेल्या हणुमंतगाव ग्रामपंचायतीत विखे गटाचे अशोक घोलप यांच्या गटाने ११ जागा घेऊन सत्ता काबीज केली. फणसे गटाला एकही जागा राखता आली नाही.