मोटारसायकलवर जाऊन मंत्री गडाख यांनी जाणल्या डवरी समाजाच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 01:54 PM2020-04-05T13:54:55+5:302020-04-05T13:55:50+5:30
नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तशी जेवणाची व्यवस्थाही त्यांनी तातडीने केली.
सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्रीशंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तशी जेवणाची व्यवस्थाही त्यांनी तातडीने केली.
मृद व जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाख हे गेल्या काही दिवसांपासून थेट मोटारसायकलने जात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याबाबत उपाययोजना करीत आहेत. मंत्री गडाख यांनी रविवारी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट दिली. तेथे कोरोना व्हायरसची माहिती देत घ्यावयाची प्रतिबंधात्मक काळजी समजावून सांगत लोकांच्या अडचणी समजावून घेत मी तुमच्या बरोबर असल्याचे सांगत धीर दिला.
भोजनाची केली व्यवस्था
बंदमुळे काम नसल्यामुळे उपासमार होत असल्याचे डवरी समाजाच्या वस्तीवरील नागरिकांनी सांगितले. यावेळी नामदेव सावंत, मोहन शेगर, साहेबराव शिंदे, भागाबाई सावंत, रुपाबाई शिंदे यांनी वस्तीवर समस्या मांडल्या. त्यावर मंत्री गडाख यांनी भोजनाची व्यवस्था होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली.
घरात रहा, सुरक्षित रहा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कौशल्याने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. या संकटाचा सामना करताना सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. घरी थांबून, गर्दी टाळून आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. सरकार सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहे. घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन मंत्री गडाख यांनी ग्रामस्थांना केले.