गड्या.. आपली शेतीकामेच बरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:58+5:302021-04-26T04:17:58+5:30
बोधेगाव : सध्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा शिरकाव थेट गावखेड्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी गड्या आपली ...
बोधेगाव : सध्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा शिरकाव थेट गावखेड्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी गड्या आपली शेतीकामेच बरी म्हणत आपला मोर्चा शेताकडे वळविला आहे. सध्या मान्सूनपूर्व मशागती, तसेच उन्हाळी पिकांच्या काढणीसाठी शेतशिवारात मजुरांसह शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते आहे.
खरीप हंगाम अवघ्या ४० दिवसांवर आलेला असून, यंदा पाऊस बरा असल्याचा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तविला आहे. शासनाने घोषित केलेल्या संचारबंदीतून शेतीकामांना सूट देण्यात आलेली आहे. यामुळे सध्या बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव, लाडजळगाव, हातगाव, मुंगी, गोळेगाव आदींसह परिसरातील गावांत शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रखरखत्या उन्हात शेताच्या बांधावरील गवत, काडीकचरा, अडगळ गोळा करून पेटवून देणे, शेतातील कपाशीच्या पऱ्हाट्या, तुराट्या काढून जमा करणे, शेतात शेणखत टाकणे, नांगरट करणे आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली जात आहेत, तसेच उन्हाळी भुईमूग, बाजरी, कांदा काढणी, तोडणीसाठी शेतकऱ्यांसह मजुरांची लगबग दिसून येत आहे. गावात विनाकारण रस्त्यावर फिरून, तसेच घरात बसून टीव्हीवरील कोरोना एके कोरोनाचीच घोकंपट्टी ऐकून धास्ती घेण्यापेक्षा शेतकरी शेतीकामांत रममाण होत आहेत. काहींनी तर शेतातच आपले बिऱ्हाड हलवून सध्याचे मुक्कामपोस्ट वावरच बनविले आहे. शाळा बंद असल्याने शाळकरी मुलांसह तरुणाईदेखील शेतीकामात रमली आहे.
----
इकडेतिकडे फिरून कोरोनाची धास्ती घेण्यापेक्षा शेतात जाऊन काम केलेले बरे. यातून घरखर्चासाठी दोन पैसे मिळतात आणि जिवाला समाधानही लाभते.
- कमलबाई घोरतळे,
शेतमजूर, बोधेगाव.
---
सध्या शेतातील कपाशी, तूर काढून रान मोकळे करण्याचे काम सुरू आहे. उसात खरबुजाचे आंतरपीक घेतले आहे. त्याची तोडणी करावी लागते. यामुळे सकाळीच शेतात यावे लागते.
- लक्ष्मण घोरतळे,
शेतकरी बोधेगाव.
----
२२बोधेगाव
बोधेगाव येथील अशोक विठ्ठल घोरतळे यांच्या शेतातील उन्हाळी भुईमूग काढणीची कामे करताना शेतमजूर.