खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:16 AM2018-10-22T06:16:09+5:302018-10-22T06:16:46+5:30

माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.

To gain power by lying is a treason; Threat of Uddhav Thackeray | खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिर्डी / अहमदनगर : माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी यांच्या पाठोपाठ रविवारी शिर्डीत येऊन उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुंबईतील दसरा मेळाव्यात मोदींवर टीका टाळणाऱ्या उद्धव यांच्या आजच्या भाषणात मात्र मोदी हेच टीकेचे लक्ष्य होते. ‘कसं काय पाहुणं बरं हाय का’ हे गाणे म्हणत त्यांनी मोदींच्या भाषणाची नक्कलही केली.
ते म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी काही लोक साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. २०१९ मध्ये पुन्हा आम्हालाच सत्ता द्या, असे साकडेही त्यांनी साईबाबांना घातले, पण पाच वर्षे सत्ता देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा सवाल साईबाबांनी त्यांना केला असेल. खोटे बोलण्यात ते पटाईत आहेत. आता २०२२ पर्यंत सगळ्यांना घरे देणार, असे सांगून शिर्डीत चावी मारून गेले,’ असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला.
सत्तेतून का बाहेर पडत नाही, असा सवाल करणाºयांनाही उद्धव यांनी जोरदार उत्तर दिले. ‘आम्ही सत्तेतून कधीही बाहेर पडू शकतो, पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घेता येत असेल तर का बाहेर पडू? शेतकºयांचे प्रश्न, दुधाला भाव, पाणी देत असाल, तर पाचशे वर्षे सत्ता देऊ, पण तुम्ही केवळ खोटे बोलून सत्ता मिळविता़, अन्याय, अत्याचारावर कुणी बोलले तर त्याला देशद्रोही, विकासाचे विरोधक ठरविता. तुम्ही तर नवे मोगल निघालात’, असा हल्ला ठाकरे यांनी चढविला.
सभास्थानी श्रीरामचे मोठे कटआउट लावण्यात आले होते. आगामी काळात राममंदिराच्या मुद्द्यावरून राज्यात
भाजपाची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून आला. राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम ही सगळी तुमची जुमलेबाजी आहे का, असा सवाल करत ‘मंदिर नही बनायेंगे’ असे एकदा सांगून टाका़ मग आम्ही काय करायचे ते करतो़, असे आव्हान उद्धव यांनी दिले.
>शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, परंतु लाखो शेतकºयांना अद्याप एक छदामही मिळालेला नाही. मग हे पैसे गेले कुठे? असा सवाल करत कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे यांनी अहमदनगर येथील सभेत केला. आजचं नगर म्हटले की, विखे, कर्डिले अन् छिंदम समोर येतात. ज्या पक्षाचा नगरसेवक छिंदम आहे, तो पक्ष कसा असेल, याचा विचार करा. निवडून दिलेल्या खासदाराला नगर ओळखत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांनाही नगरकर जनता ओळखणार नाहीत.

Web Title: To gain power by lying is a treason; Threat of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.