'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 04:29 PM2024-06-14T16:29:35+5:302024-06-14T16:33:54+5:30
Nilesh Lanke : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार निलेश लंके यांचाय आज गुंड गजा मारणेसोबतचा एक फोटो व्हायरल झाला. लंके यांनी गजा मारणे याच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या.
Nilesh Lanke ( Marathi News ) : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार निलेश लंके यांचाय आज गुंड गजा मारणेसोबतचा एक फोटो व्हायरल झाला. लंके यांनी गजा मारणे याच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान, सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका सुरू झाल्या. राजकीय वर्तुळातुनही जोरदार टीका सुरू झाल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका करत आरोप केले. दरम्यान, आता या टीकेला प्रत्युत्तर देत स्वत: खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेच्या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे.
खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला..
"काल मी दिल्लीचे काम करुन विमानतळावर उतरलो, त्यानंतर मी आमच्या ओळखीच्या पवार नावाच्या सहकाऱ्याला भेटायला गेलो. ती भेट झाल्यानंतर प्रवीण धंगे नावाच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलो. त्यांच्या घराजवळून जात असताना आम्हाला काही लोकांनी थांबवलं त्यानंतर आम्ही थांबलो. त्यावेळी ते चहा घ्यायला चला म्हणाले. त्यावेळी आम्हाला कोणाची पार्श्वभूमी माहीत नव्हती. चहा पिलो, माझा सत्कार केला. नंतर मला काही वेळाने संबंधीत व्यक्तीची पार्श्वभूमी कळाली. तो एक अपघात होता, असं स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिलं आहे.
आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेवर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. आपलं जे आहे ते आम्ही मांडलं आहे. आता प्रत्येकाच्या टीकेवर बोलायचं का?, असा सवालही लंके यांनी केला. मी गुंडगीरीला विरोध करतो, आमच्या मतदारसंघात आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना स्थान दिलेलं नाही, असंही निलेश लंके म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटातून आयत्या वेळी शरद पवार गटात गेलेले निलेश लंके जिंकून येणार नाहीत असा दावा अजितदादा गटाने केला होता, पण लंके यांनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर ते काल पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गुंड गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यावेळी मारणेने लंकेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. गजा मारणेच्या भेटीनंतर लंकेंवर टीकाटिपणी देखील होऊ लागलीये. भेट घेण्याचं कारण लंके यांनी सांगावं याबाबत राजकीय वर्तुळातून विचारणा होत आहे.