नवख्या तरुणांनी गाजवली पुरुषोत्तम स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:07 PM2018-09-04T13:07:28+5:302018-09-04T13:07:33+5:30
राज्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी नगरच्या तरुणाईने जिंकली
अहमदनगर : राज्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी नगरच्या तरुणाईने जिंकली अन् ‘आवाज कुणाचा... नगरचा़ आवाज कुणाचा...सारडा कॉलेजचा’, अशा घोषणा पुण्यात घुमल्या...तोच जल्लोष, तोच उत्साह घेऊन सारडा कॉलेजच्या ‘पी.सी.ओ.’ची टीम सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयात पोहोचली. नाटकातील काही दृष्य सादर करीत ‘पी.सी.ओ.’ टीमने मने जिंकली.
रविवारी रात्री पुण्यात पुरुषोत्तम करंडक पटकावल्यानंतर सोमवारी नगरमध्ये सारडा कॉलेजच्या ‘पी.सी.ओ.’ टीमच्या यंगिस्तानचे ठिकठिकाणी सत्कार सोहळे झाले. दरम्यान‘पी.सी.ओ.’ टीमने ‘लोकमत’ला भेट देऊन मनमोकळा संवाद साधला. ‘पी.सी.ओ.’ एकांकिकेचे लेखन अमोल साळवे याने केले असून, दिग्दर्शन विनोद गरुड याने केले आहे. ‘पी.सी.ओ.’ एकांकिकेत वेगवेगळ्या भूमिका निभावणा-या एकूण १५ जणांच्या टीमपैकी ११ जण प्रथमच पुरुषोत्तमसारख्या एकांकिका स्पर्धेत सादरीकरण करीत होते. एकांकिका सादरीकरण बहुतेकांना नवखे असूनही त्यांनी मोठी मेहनत घेऊन उत्तम सादरीकरण केले अन् पुरुषोत्तम करंडकावर मोहोर उमटविली. विनोद गरुड याने पुरुषोत्तम स्पर्धेत प्रथमच दिग्दर्शन करीत शाम ही भूमिकाही साकारली.
गेल्या वर्षी पुरुषोत्तम स्पर्धेत सारडा कॉलेजचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. अंतिम फेरीत एक बक्षिसही पटकावले होते. या वर्षी चार जण वगळले तर सर्व नवखे कलाकार घेऊन विनोद गरुड याने एकांकिका बसवली. महिनाभर त्याने सर्वांकडून तालीम करुन घेतली.
अमोल साळवेचा करंडक पटकावण्यात सलग दुस-या वर्षी सहभाग
गेल्या वर्षी नगरच्या न्यू आर्टस् कॉलेजची ‘माईक’ व सारडा कॉलेजची ‘ड्रायव्हर’ या एकांकिका पुरुषोत्तम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. यातील ‘माईक’ने करंडक पटकावला होता तर ‘ड्रायव्हर’मधील हरिष बारस्कर याला उत्तेजनाथ पारितोषिक मिळाले होते. विशेष म्हणजे ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका अमोल साळवे यानेच लिहिली होती. तसेच त्याने ‘माईक’च्या प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या वर्षी पुरुषोत्तक करंडक जिंकण्यात योगदान देणा-या अमोल साळवे याने लिहिलेली ‘पी.सी.ओ.’ ही एकांकिका यंदा पुरुषोत्तमच्या अंतिम फेरीत पोहोचली आणि त्यांनी करंडक पटकावलासुद्धा़ या एकांकिकेतही अमोलने प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळली आहे.
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय. पण माणूसपण दुरावत चाललंय, ही या एकांकिकेची वनलाईन थीम आहे. या एकांकिकेचा विषय चर्चेतून पुढे आला. सुरुवातील धर्म आणि पैसा हे दोन विषय चर्चेला घेतले होते़. यावर चर्चा करीत असतानाच ‘पी.सी.ओ.’ ची कथा सुचली. स्पर्धेतील हे आमचे पहिलेच सादरीकरण होते आणि पहिलेच बक्षीस. तेही पुरुषोत्तमसारखे मोठे. याचा खूप आनंद होतोय.
- अमोल साळवे,‘पी.सी.ओ.’ एकांकिकेचा लेखक
मी गेल्या चार वर्षांपासून नाटक करतोय. या चार वर्षात अनेक बक्षिसे मिळविली. पण पुरुषोत्तम जिंकण्याची इच्छा अपुरी होती, ती यंदा पूर्ण झाली. पुरुषोत्तम जिंकल्याचा आनंद सर्वात मोठा आहे.- -विनोद गरुड,‘पी.सी.ओ.’एकांकिकेचा दिग्दर्शक.
सोशल मीडियापासून दूर
‘पी.सी.ओ.मध्ये १९९० च्या दशकातील कथानक आहे. यातील कलाकारांनी भूमिकेशी समरस व्हावे, म्हणून दिग्दर्शक विनोद गरुड याने एक अनोखा प्रयोग प्रॅक्टिसदरम्यान राबवला. प्रॅक्टिस दरम्यान यातील सर्व कलाकार सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहिले. अत्याधुनिक साधनांचा वापर टाळण्यासाठी काही दिवस कलाकारांनी फक्त सायकलवरही प्रवास केला.
‘पी.सी.ओ.’मधील कलाकार व कंसात त्यांनी केलेल्या भूमिका
विनोद गरुड (शाम), मोनिका बनकर (राधा), विशाल साठे (तोंडावळे), गौरी डांगे (चिऊ), अविष्कार ठाकूर (हसरे), रेवती शिंदे (सौ़ हसरे), निरंजन केसकर (जॉली), आश्लेषा कुलकर्णी (आजी), सोहम दायमा (पंडितजी), बॅकस्टेज आर्टिस्ट - अमोल साळवे, स्वराज अपूर्वा (प्रकाश योजना), श्रुता भाटे (संगीत), अविष्कार ठाकूर (नेपथ्य), वैष्णवी लव्हाळे, अनिष क्षीरसागर (रंगमंच व्यवस्था)